गोंदिया : देवरी तालुक्यात अवैध जनावर वाहतुकीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत २८ जनावरे व एक ट्रक जप्त केला आहे. ही कारवाई देवरी पोलिस स्टेशन अंतर्गत करण्यात आली.
पोलीस शिपाई विशाल चंद्रकांत खांडेकर हे दिनांक ११ एप्रिलच्या रात्री पेट्रोलिंग ड्युटीवर असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की आमगावकडून देवरी मार्गे एका ट्रकमधून अवैध जनावरांची वाहतूक होत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला.
रात्री सुमारे २.३० वाजताच्या सुमारास संशयित ट्रक दिसताच पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. मात्र ट्रक चालकाने वाहन न थांबवता पळ काढला. अखेर डवकी फाट्याजवळ ट्रक सोडून चालक अंधाराचा फायदा घेत पसार झाला.
पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यात अत्यंत कमी जागेत निर्दयीपणे बांधलेली २८ जनावरे आढळून आली. यामध्ये ४ पांढरे बैल, ६ काळे बैल, १६ लाल रंगाचे बैल तसेच इतर जनावरे होती. या जनावरांची अंदाजे किंमत ३ लाख ३६ हजार रुपये आहे.
तसेच जप्त केलेला ट्रक (MH 34 AB 9771) याची किंमत सुमारे २० लाख रुपये असून एकूण २३ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० तसेच महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम १९७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवरी पोलिस करत आहेत.
या कारवाईमुळे अवैध जनावर वाहतुकीला मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








