गोंदिया : आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, देवरी या कार्यालयाचे स्पर्धा परीक्षा माहिती व मार्गदर्शनाचे तिसरे सत्र 1 डिसेंबर 2024 ते 15 मार्च 2025 या कालावधीसाठी घेण्यात येणार आहे. यासाठी आदिवासी जमातीमधील उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, शाळा सोडल्याचा दाखला व जातीचे प्रमाणपत्राच्या छायांकीत प्रतिसह देवरी येथील कार्यालयात 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावे.
प्रशिक्षणार्थ्यांची शैक्षणिक व इतर पात्रता : सदर प्रशिक्षणासाठी उमेदवार हा किमान एस.एस.सी. उत्तीर्ण असावा. उच्च शैक्षणिक पात्रताधारक व टंकलेखक/संगणक/लघुलेखक परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. उमेदवार हा आदिवासी जमाती प्रवर्गातील असावा, यासाठी स्त्री अथवा पुरुष दोन्ही पात्र आहेत. उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे. उमेदवार हा गोंदिया व भंडारा या दोन जिल्ह्यापैकी रहिवासी असावा. सदर उमेदवाराने वरील प्रशिक्षणाचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा. उमेदवाराजवळ रोजगार व स्वयंरोजगार (Employment) कार्यालयाचे ऑनलाईन नोंदणी कार्ड असावे. बँकेत खाते असलेल्या पासबुकच्या पहिल्या पानाची व आधारकार्डची छायांकीत प्रत असावी.
प्रशिक्षण कालावधी तीन महिने पंधरा दिवस म्हणजेच 1 डिसेंबर 2024 ते 15 मार्च 2025 असा असेल. निवड प्राप्त उमेदवारांना देवरी येथे राहण्याची व्यवस्था स्वत:च करावी लागेल. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन देय राहील. असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, देवरी यांनी कळविले आहे.
