गोंदिया : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या निवडणुकीकरीता 66-आमगाव विधानसभा संघात 9 नोव्हेंबर रोजी गृह मतदान करण्याकरीता पथकांना रवाना करण्यात आले. गृह मतदान सुरु होण्यापूर्वी मतदारांना गृह मतदान होणार असल्याबाबतचे बीएलओ मार्फत लेखी सूचना देण्यात आली होती. तसेच निवडणूकीत उभे असलेल्या उमेदवारांनी सदर दिनांकास आपले प्रतिनिधी उपस्थित राहण्यासंबंधी सूचना निर्गमीत करण्यात आले होते. गृह मतदान 9 नोव्हेंबर 2024 व ज्या मतदारांचे सदर दिनांकास मतदान होणार नाही त्यांचे मतदान 10 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
66-आमगाव विधानसभा मतदारसंघात दिव्यांग मतदार 27 तसेच 85 वर्षावरील मतदार 98 असे एकूण 125 मतदार असून त्यांचे मतदान 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत घेण्यात आले. सदर मतदान घेण्याकरीता मतदान पथकामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस शिपाई व सुक्ष्म निरीक्षक याप्रमाणे प्रत्येक पथकात नेमणूक केलेली होती. एकूण 13 पथकाद्वारे गृह मतदान घेण्यात आले असून दुसऱ्या दिवशी सुध्दा ज्यांचे मतदान झाले नाही अशा मतदारांचे मतदान घेण्यात येणार आहे. तरी संबंधित मतदारांनी मतदान पथक आपल्या घरी आल्यास गृह मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवरी यांनी केले आहे.
