
संवाद चिमुकल्यांशी अंतर्गत राज्यामध्ये सर्व आश्रमशाळांमध्ये लोकप्रतिनिधी व अधिकारी कर्मचारी यांचा मुक्काम..
देवरी ग्रामीण : आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत व शासकीय वसतिगृहामध्ये शेकडो आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत,या निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे पालकत्व हे त्या शाळेतील कर्मचाऱ्यांवर असते त्यामुळे या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांना प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन, विद्यार्थ्यांमधील समन्वय साधण्यासाठी आदिवासी विकास मंत्री मा.प्रा.डॉ.अशोक उईके यांच्याकडून ‘संवाद चिमुकल्यांशी’ हे अभियान दिनांक 7 फेब्रुवारी 2025 ला राज्यभर राबविले गेले. या अंतर्गत आदिवासी विकास विभागातील अधिकारी व कर्मचारी हे शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांसोबत मुक्कामी होते.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत 11 शासकीय आश्रमशाळा व 19 वसतिगृह आहेत या सर्व ठिकाणी प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष मुक्कामी राहून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला सोबतच आश्रमशाळेतील व वसतिगृहातील भौतिक बाबी, शैक्षणिक बाबी याची सुद्धा पडताळणी केली गेली. अधिकाऱ्यांनी शाळेत मुक्काम केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह व नवचैतन्य निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले. विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला आणि मनातील प्रश्नांना वाट करून दिली तर काही विद्यार्थ्यांनी कौटुंबिक प्रश्नही अधिकाऱ्यांना विचारले अशा अनेक प्रकारच्या रंजक पद्धतीने सवांद साधला गेल्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.आश्रम शाळेत शिकणारा विद्यार्थी सर्व आघाड्यांवर यशस्वी व्हावा व इयत्ता 10 वी 12 वी नंतर विविध कशाप्रकारे अभ्यास करून शैक्षणिक दिशा ठरवावी व यश संपादन करावे याअनुषंगाने विद्यार्थ्यांसोबत गप्पा झाल्या तसेच सुरु असणाऱ्या Brighter Mind, Memeory Enhance, बोलका वर्ग, मिशन शिष्यवृत्ती, क्रीडा उभारी या बाबत अनऔपचारिक गप्पा झाल्या,अधिकाऱ्यांची असलेली नैतिक जबाबदारी या सर्व बाबी ‘संवाद चिमुकल्यांशी अभियानातून’ साध्य झाल्याचे दिसून आले.
हा संवाद आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी सार्थक ठरणार हे नक्की..!
शासकिय आश्रमशाळा, पुराडा येथे मा. आमदार संजय पुराम यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न बघावीत मी याच आश्रमशाळेमध्ये शिकत असताना आमदार होण्याचे स्वप्न बघितलं होतं ते मी आज सत्यात उतरवलं त्यामुळे विद्यार्थ्यांनो मोठी स्वप्न बघा व त्यासाठी खूप मेहनत करा यश तुम्हाला नक्की मिळेल असे सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले. तसेच सौ.सविताताई संजय पुराम , सभापती,महिला व बालकल्याण, जि.प.गोंदिया यांनी शासकिय आश्रमशाळा, बिजेपार येथे भेट देवून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांनी अतिदुर्गम अशा ईळदा आश्रमशाळेत जाऊन तेथील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. आपल्या जीवनात थोड्या बहुत समस्या या सदैव राहणार आहेत त्यामुळे या समस्यांचा बाऊ न करता आपण समस्यांवर मात करून आपली प्रगती कशी करून घेता येईल याचा विचार करायला हवा असे सांगितले.विभाग सदैव आपल्या सोबत सर्व टप्प्यावर सोबत असेल असे अशश्वस्त केले तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी समजून घेतल्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मनसोक्त उत्तरे दिली व विद्यार्थ्यांसोबत भोजन सुद्धा केले यामुळे आश्रमशाळा इळदा येथील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता. सहाय्यक प्रकल्प अधिकारी कु. सायली चिखलीकर या कन्या आश्रमशाळा बोरगाव ,शिरीष सोनेवाने आश्रमशाळा ककोडी व सुनील भुसारी हे आश्रमशाळा शेंडा येथे मुक्कामी होते. तसेच इतर सर्व आश्रमशाळेत व शासकीय वसतिगृहात प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष मुक्कामी राहून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
