गोंदिया ( देवरी ) : शहरात तीन दिवसांपासून सायंकाळी वादळी पाऊस कोसळत असून, यामुळे देवरीकर त्रस्त झाले आहेत. थोडा वेळ जरी पाऊस पड़ला तरी शहरांत सखल भागात पाणी तुंबते आहे.
देवरी शहर व तालुक्यात चार-पाच दिवसांपासून दररोज सायंकाळी वादळी पाऊस पडतो. त्यामुळे वीजपुरवठाही खंडित होत असल्याने नागरिकांना दोन-तीन तास अंधारात काढावे लागतात. शहरातील सखल भागात पाणी सांचत असून, पुर्णता नालेसफाई न झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. आताच ही स्थिती तर अतिवृष्टी झाल्यास शहरात पूरस्थिती निर्माण होईल,अशी भीती नागरिकांना आहे.
शहरातील ऐतिहासिक चवदार केशोरी तळ्यासमोरच्या रस्त्यावरच मोठ्याप्रमाणात पाणी साचत असल्याने या ठिकाणी येणार्या – जानार्या पर्यटकांना तसेच पादचारी व वाहनचालकांची गैरसोय होते. शहरात पाणी साचण्याच्या या घटनांमध्ये वाढ़ होऊ लागल्याने समाजमाध्यमांवरही देवरी नगरपंचायत प्रशासनावर नागरिक शिंतोड़े उड़वताना दिसत आहेत.
देवरी शहरातील प्रभाग क्रमांक 12 येथील गार्डन समोरील मुख्य रस्त्याने तलावाचे स्वरुप घेतले आहे. तर शहरातील अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. नगरपंचायतने पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था पावसाळ्या पुर्वी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
