गडचिरोली विमानतळासाठी प्रस्तावित भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; पर्यायी जागेचा शोध सुरू : सहपालकमंत्री जयस्वाल यांचे स्पष्टीकरण

गडचिरोली : शहरालगतच्या नवेगाव, मुरखळा, पुलखल, मुडझा (बु) व मुडझा (तु) या गावांमध्ये प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादनाला स्थानिक शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. सुपीक जमिनी घेऊन विमानतळ उभारणे स्थानिकांच्या हिताचे नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे. त्यांच्या भावना लक्षात घेऊनच सद्यस्थितीत हे भूसंपादन थांबवून पर्यायी जागेचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती सहपालकमंत्री ऍडव्होकेट. आशिष जयस्वाल यांनी दिली.

जयस्वाल २३ जून रोजी गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते. जिल्हा परिषद कार्यालयात जिल्हा आढावा बैठक घेतल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषद सीईओ सुहास गाडे आदी उपस्थित होते.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सहपालकमंत्री जयस्वाल म्हणाले की, १ जून रोजी काही शेतकऱ्यांनी मला भेट घेतली होती. कोटगल येथील सिंचन प्रकल्पामुळे आधीच पूरक असलेल्या या सुपीक जमिनी विमानतळासाठी घेणे योग्य ठरणार नाही, अशी त्यांची भावना होती. या शेतकऱ्यांनी आर्तपाणे आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या भावना आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवल्या. त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पर्यायी जागेचा शोध घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच देसाईगंज येथे JSW कंपनीच्या नियोजित प्रकल्पासाठीही शेतकऱ्यांचा विरोध असल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना जयस्वाल म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करतानाच राज्य सरकार कायद्याप्रमाणे उद्योगवाढीसाठी प्रयत्न करत आहे. योग्य भरपाई देऊन भूसंपादन करणे हे धोरण आहे.

शासन शेतकरीहितासाठी कटिबद्ध –

संपूर्ण प्रकरणात शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही अँड. आशिष जयस्वाल यांनी दिली. कोणताही विकास प्रकल्प जनतेच्या विश्वासाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही, हे शासन समजून आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें