अमरावती : भारतीय कापूस संशोधन संस्था, नागपूर तर्फे राबविण्यात येत असलेल्या कीटकनाशक प्रतिकारक्षमता व्यवस्थापन – गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन या केंद्र शासन पुरस्कृत प्रकल्पांतर्गत, अमरावती जिल्हा केंद्राच्या वतीने दर्यापूर तालुक्यातील भांबोरा(जितापूर) येथे नुकतेच शेतकरी प्रशिक्षण व ट्रायकोकार्ड निविष्ठा वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास तालुक्यातील आराळा, बोराळा, जितापूर, भांबोरा व नायगाव या पाच गावातील लाभार्थी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी जैव नियंत्रण उपायांचा अवलंब करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच प्रत्येक शेतकऱ्यास ट्रायकोकार्डचे वितरण करून त्याच्या योग्य वापराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. प्रकल्पासाठी डॉ. बाबासाहेब फंड (वरिष्ठ शास्त्रज्ञ) व डॉ. निलकंठ हिरेमणी (वरिष्ठ शास्त्रज्ञ) हे जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहत आहेत तसेच प्रकल्पाचे मंगेश राठोड (संशोधन सहायक), निखिल मनोहरे (प्रकल्प सहायक) यांनी जैव नियंत्रनातील ट्रायकोकार्ड्सचे महत्त्व सांगितले.
व त्यांच्या योग्य वापर लावण्याची वेळ आणि पद्धत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच ट्रायकोकार्ड लावण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दिले आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.








