गोंदिया : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे व 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून त्याअनुषंगाने जिल्ह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू करण्यात आले आहे.
लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 126 अंतर्गत मतदानाच्या दिवसापासून 48 तास पूर्व प्रचार कार्यक्रम संपणार आहे. त्यानुसार 63-अर्जुनी मोरगाव, 64-तिरोडा, 65-गोंदिया व 66-आमगाव विधानसभा मतदार संघातील मतदार नसलेले सर्व राजकीय पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते, प्रचाराची धुरा सांभाळणारे सर्व व्यक्ती व प्रचाराकरीता आलेले सर्व स्टार प्रचारक हे निवडणूक प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर विधानसभा मतदारसंघात राहिल्यास त्यांचेकडून प्रचार मोहीम राबविली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये दिलेल्या शक्तीचा वापर करुन खालील प्रमाणे प्रतिबंध आदेश पारीत केला आहे.
तिरोडा व गोंदिया विधानसभा मतदारसंघात मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर म्हणजे 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपासून आणि अर्जुनी मोरगाव व आमगाव विधानसभा मतदारसंघात मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर म्हणजे 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपासून विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नसलेले सर्व राजकीय पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते, प्रचाराची धुरा सांभाळणारे सर्व संबंधित व्यक्ती तसेच निवडणूक प्रचार कार्यक्रमासाठी आलेले सर्व राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक यांना गोंदिया जिल्ह्याच्या सीमेत राहण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई असेल. परंतु ही अट दारोदारी निवडणूक प्रचार करण्यासाठी किंवा घरोघरी भेटीकरीता लागु राहणार नाही. मतदान संपण्याच्या 48 तासामध्ये ध्वनीक्षेपणाच्या वापरावर पुर्णत: बंदी राहील. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
