तब्बल १३ वर्षांनंतर आमगाव खुर्दकरांना मतदानाची संधी : सालेकसा नगरपंचायत निवडणूक जवळ

गोंदिया ( सालेकसा ) : सालेकसा नगरपंचायतीची निवडणूक येत्या ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात असून, या निवडणुकीत आमगाव खुर्द येथील नागरिकांना तब्बल १३ वर्षांनंतर आपला स्थानिक प्रतिनिधी निवडण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे गावात उत्सुकतेचे वातावरण आहे, तर राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.

२०१२ नंतर मतदानच झाले नाही –

आमगाव खुर्द ग्रामपंचायतीची शेवटची निवडणूक २०१२ साली झाली होती. त्यानंतर २०१५ मध्ये सालेकसाला नगरपंचायतचा दर्जा मिळाला, मात्र आमगाव खुर्दचा समावेश नगरपंचायतीत करण्यात आला नव्हता. त्यामुळे २०१७ मध्ये ग्रामपंचायतीच्या नव्या निवडणुकीसाठी अधिसूचना आली असतानाही, आमगाव खुर्दकरांनी नगरपंचायतमध्ये समावेशाच्या मागणीसाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. परिणामी मतदानच होऊ शकले नाही.

ना ग्रामपंचायत, ना नगरपंचायत – पोरकं स्थित्यंतर –

२०१७ नंतर गावाचा ना ग्रामपंचायतीत समावेश होता, ना नगरपंचायतीत. २०१८ मध्ये अखेर गावातील नागरिकांनी तीव्र आंदोलन उभारले आणि ग्रामपंचायत सदस्य ब्रजभूषण बैस यांनी न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे अखेर आमगाव खुर्दचा समावेश सालेकसा नगरपंचायतीत करण्यात आला. मात्र, त्या वेळी सालेकसा नगरपंचायतीचा कार्यकाळ फक्त एक वर्ष शिल्लक असल्याने पुन्हा निवडणूक न घेता प्रशासकीय पद्धतीने कारभार सुरू ठेवण्यात आला.

जि.प. व पं.स. क्षेत्रात बदल, मतदानाला मुकले मतदार –

२०२१ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमगाव खुर्दचा समावेश नव्या तिरखेडी गटात करण्यात आला. पण सालेकसा नगरपंचायतीचा भाग झाल्याने ग्रामपंचायतीसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांतही गावातील नागरिकांना मतदान करता आले नाही.

१३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता आशेचा किरण –

आता सालेकसा नगरपंचायतीचा कार्यकाळ २०२२ मध्ये संपल्यानंतर तब्बल अडीच वर्षांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने ऑक्टोबर २०२५ मध्ये निवडणूक घेण्याचे संकेत दिले असून, त्यानुसार आमगाव खुर्दच्या नागरिकांना तब्बल १३ वर्षांनंतर मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळणार आहे.

स्थानीय नागरिक आणि नेत्यांचे मत –

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे आमगाव खुर्दचा सालेकसा नगरपंचायतमध्ये समावेश झाला. मात्र गेल्या आठ वर्षांत निवडणूकच झाली नाही. आता आमच्या लोकांना खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी मिळणार आहे. ब्रजभूषण बैस, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सालेकसा

१३ वर्षापूर्वी आम्ही मतदान केले होते. त्यानंतर आम्हाला मतदानाची संधीच मिळाली नाही. आता निवडणूक होणार असून, आम्ही आमचा हक्क बजावू शकणार, याचा आनंद आहे.

स्थानीय रहिवासी, आमगाव खुर्द

आता सर्वांचे लक्ष ऑक्टोबर महिन्याकडे लागले असून, १३ वर्षांच्या राजकीय व प्रशासकीय अनिश्चिततेनंतर आमगाव खुर्दकरांना त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रतिनिधीला निवडण्याचा ऐतिहासिक क्षण अनुभवता येणार आहे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें