गोंदिया ( देवरी ) : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश महसूल विभागाशी संबंधित सेवा व विविध शासकीय योजनांचा लाभ थेट तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे व प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करणे हा आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार संजय पुराम यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या प्रभावी नियोजनाखाली व उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांच्या पर्यवेक्षणाखाली देवरी तालुक्यात मंडळ स्तरावर समाधान शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.
या अभियानांतर्गत देवरी तालुक्यात दि.7 मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय मुरमाडी, 14 मार्चला ग्रामपंचायत कार्यालय भर्रेगाव, 10 एप्रिल रोजी आदिवासी आश्रम शाळा बोरगाव बाजार,
17 एप्रिल रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था पालांदुर, 8 मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय लोहारा, 15 मे रोजी नगरपंचायत देवरी येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिरांमध्ये सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत नागरिकांच्या महसूल विषयक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. तसेच शिबिरामध्ये फेरफार नोंदी, 7/12 व अभिलेख दुरुस्ती, वारस नोंदी, विविध प्रमाणपत्रे, लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत सेवा, पीएम किसान, ॲग्रीस्टॅक तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये आमदार संजय पुराम हे स्वतः उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करणार असून नागरिकांच्या तक्रारी एैकून घेऊन त्यांचे तात्काळ निवारण करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना देणार आहेत.
शिबिराच्या पुर्वतयारीसाठी मंडळ स्तरावर सर्व विभागांचा समन्वय आढावा घेण्यात आला असून प्रत्येक विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची गावनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना गावांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी संवाद साधण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
शिबिराची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी दवंडी, बॅनर, सोशल मीडिया तसेच प्रिंट मीडियाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. तसेच लोकप्रतिनिधी, महिला बचत गट व स्वयंसेवी संस्थांचा सहभागही सुनिश्चित करण्यात आला आहे.
तरी देवरी तालुक्यातील नागरिकांनी या समाधान शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवनाथ कातकडे, अप्पर तहसीलदार, चिचगड यांनी केले आहे.









