गोंदिया ( सेलकसा ) : दि. 18 जून 2025 रोजी गिरोला (ता. सालेकसा) येथील सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभेला मा. श्री प्रजीत नायर सर, जिल्हाधिकारी, गोंदिया (भा.प्र.से.) यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामसभेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. त्यांनी ग्रामसभा कार्यपद्धती, CFR अंतर्गत जल व मत्स्य संपदेचे व्यवस्थापन, वनसंवर्धन व व्यवस्थापन आराखडे, तसेच इतर सामाजिक व पर्यावरणीय विषयांवर सखोल संवाद साधला.
ग्रामसभा गिरोला यांनी CFR क्षेत्रात निर्माण केलेल्या ‘रानमेवा पार्क या अभिनव उपक्रमाची माहिती मा. जिल्हाधिकाऱ्यांनी उत्सुकतेने जाणून घेतली. त्यांनी त्या ठिकाणी स्वतः रोप लावून या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन केले. या क्षणाने ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत जिल्हाधिकारी यांचे सामुदायिक वन हक्क आराखडा तयार करण्याची निर्देश मा. जिल्हाधिकाऱ्यांची CFR संबंधी सकारात्मक भूमिका पाहता ग्रामसभेचे कार्य अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास ग्रामस्थांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवला.
या भेटीदरम्यान ग्रामपंचायत सरपंच श्रीमती मेंढे ताई, सालेकसा तालुक्यातील 10 ग्रामसभा पदाधिकारी, तसेच मा. प्रकल्प अधिकारी श्री उमेश काशीद (ITDP, देवरी), मा. तहसीलदार, व श्री कोंडागुर्ले सर (सालेकसा) आदी मान्यवर उपस्थित होते.
या विशेष भेटीत एक उल्लेखनीय बाब म्हणजे, मा. जिल्हाधिकारी साहेबांनी ग्रामस्थांमध्ये बसून त्यांच्या समस्या समजून घेतल्या, त्यांच्याशी थेट संवाद साधला. जिल्हा प्रशासनाच्या या लोकाभिमुखतेचे ग्रामसभेच्या वतीने मनःपूर्वक स्वागत व कौतुक करण्यात आले.
