गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदासंघाच्या यादीची नोंदणी सुरू
गोंदिया : पदवीधर मतदार संघाच्या मतदानासाठी जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील पदवीधरांनी नव्याने नोंदणी करणे अनिवार्य असल्याने पदवीधरांनी नोंदणी करावी, असे आवाहन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी प्रजित नायर यांनी आज केले.
जिल्हा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते . महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्हा नागपूर विभाग पदवीधर मतदासंघाची मतदार यादी नव्याने तयार करण्यासाठी महाराष्ट्र निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. या कार्यक्रमानुसार, 01 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी तयार केली जाईल. संबंधित मतदार यादीत नोंदणी करण्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी व इतरांनाही माहिती द्यावी असेही ते यावेळी म्हणाले.
सध्या जिल्ह्यात जवळपास 16000 पदवीधर मतदारांची नोंदणी आहे. नव्याने झालेले पदवीधर, महाराष्ट्र शासनाचे जिल्ह्यातील विभागातील अधिकारी कर्मचारी, केंद्र शासनाच्या विविध विभागातील अधिकारी कर्मचारी, शिक्षक, यासह इतर पदवीधर यांनी नोंदणी करावी. जगातील कुठल्याही शासनमान्य संस्थेतून पदवी अथवा पदवी समतुल्य असलेला दाखला पदवीधर मतदार म्हणून नोंदणी मान्य आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मतदार नोंदणीच्या माहिती खालील प्रमाणे
नोटीसीचे प्रथम पुनप्रसिद्धी: 15 ऑक्टोबर 2025 (बुधवार)
नोटीसीचे द्वितीय पुनप्रसिद्धी 25 ऑक्टोबर 2025 (शनिवार)
दावे आणि हरकती स्वीकारण्याची अंतिम तारीख: 6 नोव्हेंबर 2025 (गुरुवार)
प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी: 20 नोव्हेंबर 2025 (गुरुवार)
दावे व हरकती निकाली काढणे आणि अंतिम यादी तयार करणे: 25 डिसेंबर 2025 (गुरुवार)
मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी: 30 डिसेंबर 2025
अर्ज कसा करावा
अर्जदारांनी स्वयंसाक्षांकित केलेल्या पदवी गुणपत्रिकेची प्रत आणि अन्य संबंधित प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
तसेच, अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आधार कार्ड किंवा निवडणूकीचे ओळखपत्र देखील जोडावे लागेल.
शासकीय कर्मचारी असलेल्या अर्जदारांनी सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र नमुना 18 सोबत जोडावे.
निवडणूकीसाठी पात्रता
अर्ज करणारी व्यक्ती भारताची नागरिक असावी आणि गोंदिया जिल्ह्यातील त्या मतदार संघाचा सामान्य रहिवासी असावा.
अर्जदाराने 01 नोव्हेंबर 2025 पर्यंत किमान 3 वर्षांच्या पदवीला (किंवा समतुल्य) पात्रता प्राप्त केली असावी. अर्थात ज्यांची पदवी 1 नोव्हेंबर 2022 ला झालेली असेल त ते पदवीधर नोंदणी करू शकतात.
अर्ज सादर करण्याची सूचना
अर्ज संस्थेच्या प्रमुखांद्वारे एकत्रित पाठवता येऊ शकतात, तसेच कुटुंबाच्या सदस्यांच्या अर्जांची एकत्रित नोंदणी होऊ शकते.
राजकीय पक्ष, मतदान केंद्र प्रतिनिधी किंवा रेसिडंट वेलफेअर असोसीएशनसाठी एकत्रित अर्ज सादर करणे बंदी आहे.
अर्ज दाखल करण्यासाठी स्थाने:
गोंदिया जिल्ह्यातील सर्व उपविभागीय तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि तहसिलदार हे पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. ते अर्ज स्वीकारतील.
पदवीधर मतदारसंघांच्या ऑनलाइन नोंदणीची सुविधा सुरू झाली आहे. Link https://mahaelection.gov.in या आणि गोंदिया जिल्ह्याच्या www.gondia.gov.in या संकेतस्थळावरही जाऊन आपण फॉर्म डाऊनलोड करून माहिती भरू शकता.
गोंदिया जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी वरील वेळापत्रकानुसार अर्ज दाखल करून मतदार यादी तयार करण्याच्या या महत्त्वाच्या कार्यक्रमात सक्रियपणे सहभाग नोंदवून लोकशाही अधिक सक्षम करण्यात हातभार लावावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.









