गोंदिया : प्रतापगड येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाशिवरात्री निमित्ताने दि. १५ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महाशिवरात्री यात्रा व उस्मान गणी हारुनी ऊर्स मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणार असून या यात्रेसाठी सुमारे तीन ते चार लाख भाविक व यात्रेकरू उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यात्रेकरूंची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी सुरू केली आहे.
यात्रेदरम्यान येणाऱ्या भाविकांची सुरक्षितता, सुविधा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून नियोजन करण्यात आले आहे. यात्रा सुरळीत, सुरक्षित व शिस्तबद्ध पार पडावी यासाठी पोलीस विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग, ग्रामपंचायत, वीज वितरण, पाणीपुरवठा, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन तसेच जनसंपर्क विभाग आदींच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, पार्किंग, सुरक्षा बंदोबस्त तसेच आपत्कालीन मदत केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच गर्दी नियोजन व नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत.
प्रतापगड येथील महाशिवरात्री यात्रा व उस्मान गणी हारुनी ऊर्स हा धार्मिक सलोखा व सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेला उत्सव असून अधिकाधिक भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेले आहे. काही अडचण उद्भवल्यास महत्त्वाचे मोबाईल क्रमांक प्रसिद्ध करण्यात येत आहेत.









