मतदानाच्या दिवशी सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

गोंदिया :  भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानुसार जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सर्व नोंदणीकृत मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा याकरीता जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून मतदारांचा सहभाग वाढविण्याकरीता प्रशासनातर्फे प्रयत्न सुरु आहेत.

         निवडणूकीची मतदान प्रक्रिया निर्भय, शांततामय वातावरणात व निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सदर प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदान साहित्यासह मतदान पथक 19 नोव्हेंबर 2024 रोजी पोहचणार असून त्यांच्याजवळ ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व इतर सर्व संवेदनशील साहित्य राहणार आहे. सदर साहित्यास अपाय होऊ नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 क्र.22 ची कलम 37 (1) (3) अन्वये निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 2023 चे कलम 163 अन्वये मतदानाच्या कालावधीत विविध बाबींवर प्रतिबंध लागू करण्यात आले आहे.

        मात्र मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ठिक-ठिकाणी आठवडी बाजार आयोजित करण्यात येत असतो. त्यामुळे मतदानाच्या दिवशी नागरिकांच्या गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याअर्थी बाजार व जत्रा अधिनियम 1862 चे कलम 5 (अ) व (क) अंतर्गत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये त्यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दिवशी नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी गोंदिया जिल्ह्यातील सर्व ठिकाणी आयोजित करण्यात येणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें