मनालीतील साहसक्रीडा ठरली धोकादायक : नागपूरच्या १२ वर्षीय मुलीचा झिपलाइनिंग दरम्यान अपघात, ३० फूट खाली पडल्याने गंभीर दुखापत

नागपूर : उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मनालीला गेलेले नागपूरमधील बिजवे कुटुंबीयांसाठी ही सहल एका दुःखद अनुभवात परिवर्तित झाली. मनालीतील झिपलाइनिंग करताना केबलचा हुक तुटल्यामुळे १२ वर्षीय त्रिशा प्रफुल्ल बिजवे ही थेट ३० फूट उंचीवरून खाली पडली. या दुर्घटनेत तिच्या दोन्ही पायांना गंभीर फॅक्चर झाले
असून तिच्यावर सध्या नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रफुल्ल बिजवे, त्यांची पत्नी आणि मुलगी त्रिशा हे तिघे सुट्टीसाठी मनालीला गेले होते. ८ जून रोजी एका झिपलाइनिंग ॲडव्हेंचर स्पॉटवर त्यांनी साहसक्रीडा प्रकाराचा अनुभव घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, झिपलाइनिंग करत असताना अर्ध्या मार्गावर असताना केबलचा हुक तुटल्याने त्रिशा अचानकपणे खाली कोसळली.

दुर्घटनेनंतर त्रिशाला तातडीने मनालीतील स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला चंदीगड येथे हलवण्यात आले. तिथे काही दिवस उपचार घेतल्यानंतर तिला नागपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नुकतीच तिची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे वडील प्रफुल्ल बिजवे यांनी सांगितले.

या घटनेनंतर त्रिशाच्या कुटुंबियांनी संबंधित झिपलाइनिंग केंद्रावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. झिपलाइनिंगसाठी आवश्यक असलेल्या सुरक्षात्मक उपाययोजना त्या ठिकाणी नव्हत्या. इतकेच नव्हे तर अपघात घडल्यानंतर तातडीची वैद्यकीय मदतही उपलब्ध करून दिली गेली नाही, अशी तक्रार त्यांनी केली.

या अपघाताचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्रिशा झिपलाइनिंग करताना अर्ध्या मार्गावर असताना अचानक हुक तुटतो आणि ती जोरात खाली पडताना दिसते. हा दृश्य अत्यंत धक्कादायक असून अनेक नागरिकांनी संबंधित ॲडव्हेंचर कंपनीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

या घटनेने साहस पर्यटनात सुरक्षेच्या नियमांचे पालन किती आवश्यक आहे, यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे. स्थानिक प्रशासनानेही या घटनेची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कडक नियम आणि नियंत्रण गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें