रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं, मविआच्या मागणीला मोठं यश

मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची अखेर बदली झाली आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी सातत्याने मागणी लावून धरली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश आल्याचं दिसतंय. उद्या (5 नोव्हेंबर) दुपारी 1 वाजेपर्यंत तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नावे राज्याच्या प्रशासनाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पाठवायचे आहेत. त्याआधी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यावर राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. लवकरच राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकांची निवड केली जाणार आहे.

काँग्रेसचे रश्मी शुक्ला यांच्यावर अनेक आक्षेप

रश्मी शुक्ला यांची सेवा जून 2024 रोजी समाप्त झाली असतानाही भाजप, युती सरकारने जानेवारी 2026 पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली होती, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. तसंच रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त राहिली असून नियमबाह्य कामे करणे तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावण्याची कामे त्यांनी केली आहेत, असाही आरोप नाना पटोलेंनी केला होता.

निवडणूक आयोगाकडून बदली करण्याचा आदेश

नाना पटोले, काँग्रेसच्या या आक्षेपानंतर आता भारतीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात विधानसभेची निवडणूक लागलेली आहे. एकीकडे या निवडणुकीची धूम चालू असताना दुसरीकडे निवडणूक आोयगाने रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा आदेश दिला आहे.

अन्य वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कार्यभार सोपवण्याचा आदेश

विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या आक्षेपांनंतर निवडणूक आयोगाने तत्काळ प्रभावाने रश्मी शुक्ला यांची बदली करावी, असा आदेश दिला आहे. रश्मी शुक्ला यांची बदली करून पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार शुक्ला यांच्यानंतरच्या सर्वांत वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवावा, असेही निर्देश निवडणूक आयोगने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें