गोंदिया ( देवरी ) ; दोन महिन्यांची सुट्टी संपून देवरी तालुतील शाळांची आज सोमवारी पहिली घंटा वाजली. पहिल्याच दिवशी सवंगड्यांना भेटण्याची ओढ, नवीन गणवेश आणि शालेय साहित्य मिळाल्याने चेहर्यावर पसरलेला आनंद, तर काहींमध्ये असलेली शाळेची भीती, आई-बाबांपासून दूर जायचे म्हणून कोसळलेले रडू अशा संमिश्र वातावरणात शाळेचा पहिला दिवस पार पडला.
उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर आज सोमवारी शाळेची पहिली घंटा वाजली. तालुक्याभर प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सवाची धूम बघायला मिळाली. त्यातच तालुक्यातील प्रख्यात व नावाजलेली पी. एम.श्री जिल्हा परिषद शाळा भागी येथे शिक्षकांसह शालेय समितीतील पदाधिकार्यांनी शाळेत पाऊल ठेवणार्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन, बँड पथकाच्या निनादात स्वागत केले. भागी येथिल शाळा सुशोभित करण्यात आली होती. मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांची शाळांच्या परिसरात गर्दी केली होती. अनेक विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिलाच दिवस असल्याने थोडा वेळ का होईना पण आई-बाबांपासून दूर राहायचे या कल्पनेने या मुलांना रडू कोसळले होते, तर काही मुले नवीन मित्रांशी गट्टी जमवितांना दिसली.
शाळेच्या पहिल्याच दिवशी रिक्षावाल्या काकांचेही काम सुरू झाले. सकाळी आठ वाजल्यापासून रस्त्यावरून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या रिक्षा धावू लागल्या होत्या. विद्यार्थीही रिक्षावाल्या काकांची वाट पाहत, सकाळीच तयारी करून घराबाहेर उभे होते. तर अनेक पालकांनी मुलांचा पहिला दिवस म्हणुन स्वत: शाळेत हजेरी लावली. बर्याच दिवसांनंतर जुने मित्र भेटल्याचा आनंद मुलांमध्ये होता.
शालेय साहित्य मिळाल्याने मुलांच्या चेहर्यावर आनंद. . .
पी.एम.श्री जि.प.शाळा भागीतील देवी सरस्वतीच्या फोटोचे वंदन करण्यात आले. पुजे प्रसंगी भागी गावात विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. शाळेचा परिसर रांगोळी, पताका यांनी सजविण्यात आला होता. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात आली. भागी शाळेच्या प्रवेशव्दारावर तोरण , फुगे बांधण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांना शिरा देण्यात आला. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत औक्षण करून केले. तसेच मुलांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. शाळांमधे रांगोळी काढून, गुलाबाचे फुल व चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी नवीकोरी पुस्तके मिळाल्याने मुलांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मुलांना वर्गात बसविण्यासाठी पालकवर्गाला थोडी कसरत करावी लागत होती.
याचीं होती हजेरी…
या प्रसंगी सुरेश हर्षे जि.उपाध्यक्ष व शिक्षन सभाती गोंदिया, डॉ. अजय उमाटे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सालेकसा ,गटाबोडी ग्रामपंचायतचे सरपंच मनोहर राऊत, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष गोपाल तिवारी, तालुका अध्यक्ष सी. के. बिसेन, राष्ट्रवादिचे वरिष्ट नेते भय्यालालजी चांदेवार, युवा तालुका अध्यक्ष सुजित अग्रवाल शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी , सदस्य व पालक वर्ग उपस्तीत होते. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक नरेन्द्रं अमृतकर यानीं केले तर आभार लाडे सर यानीं मानले.
