विविध हॉटेल, धाब्यांवर व्यवसायाचे जाळे..
गोंदिया ( देवरी ) ; नागपुर – रायपुर महामार्गावर लोखंडी सळई (स्टील ) खरेदी-विक्रीचा अवैध धंदा तेजीत आहे. या व्यवसायाचे थेट वाहनचालकांशी कनेक्शन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महामार्गावरील घाटा खालील व देवरी पोलिस्टेसनच्या हद्दीत असलेल्या विविध हॉटेल, धाब्यांवर व्यवसायाचे जाळे पसरले असून, दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती सुत्रांद्वारे मिळत आहे.
महामार्गावरील देवरी घाटा खाली धाब्यांवर दिवस-रात्र लोखंडी सळया खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू असल्याचे नागरीकांकडून बोलले जात आहेत. महामार्गालगतच राजरोसपणे ट्रक अथवा कंटेनरमधून सळया उतरविल्या जातात. त्याच सळयांची खुलेआमपणे विक्री केली जाते. घर, बंगला अथवा कन्स्ट्रक्शनची कामे सुरू असलेले नागरिक दोन रुपये वाचतात, म्हणून स्टील खरेदी करताना हॉटेल, धाब्यांवर चकरा मारताना दिसून येतात. तसेच देवरी सहरातील काही अधिकृत दुकानदारांनाही येथूनच स्टील विक्रीसाठी पाठविले जात असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये झडत आहे. देवरी पोलिस्टेसन हद्दीतील घाटाच्या खालच्या बाजुत महामार्गावरील ठराविक स्पॉट स्टील खरेदी विक्रीसाठी कुप्रसिद्ध झाले असून, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, हे विशेष. या व्यवसायाचे कनेक्शन थेट वाहनचालकांशी असल्याची माहिती मिळत आहे.
विशेषता भिलाई येथे सळया बनविण्याचे कारखाने आहेत. थेट कारखान्यापासूनच या व्यवसायिकांची ’लिंक’ असल्याचे समजते. कारखान्यातून भरलेली गाडी जेथे खाली होणार, तेथेही संबंधित चालक अथवा अवैध व्यावसायिक यांचे ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याचीही धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्टील खरेदी-विक्रीतून लाखो रुपयांची रोज उलाढाल होत आहे. या व्यवहारातील स्टीलच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. विशेषता छत्तीसगड राज्यातील भिलाई स्टील कारखाना स्टील उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. भिलाई येथे उत्पादित होणार्या स्टीलसाठी राज्यातील नागपूर, पुणे, औरंगाबाद, अहिल्यानगर, नाशिक याबरोबरच अनेक शहरे बाजारपेठ म्हणून उपलब्ध आहेत. याबरोबरच परराज्य, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील भिलाई येथील स्टील निर्यात केले जाते.
भिलाईवरुन, नागपुर बाजारपेठेत जाणार्या स्टीलची देवरी महामार्गावरून वाहतूक होत असते. वाहतूक करणार्या ट्रक, तसेच कंटेनरमधून देवरी पोलिस्टेसन हद्दीतील महामार्गावरील घाटा खालील विविध हॉटेल, धाब्यांवर स्टील अनधिकृतपणे उतरवले जाते. त्यातूनच स्टीलच्या अवैध खरेदी-विक्रीचा काळाबाजार तेजीत सुरू झाला आहे?यात संबंधित ट्रकचालक अवैध व्यवसाय करणारे व्यावसायिकांचे संबंधित कंपनी अथवा जेथे माल खाली होणार आहे, त्यांच्याशी हात मिळवणी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. खुलेआमपणे चालणार्या या घाटाखालील अवैध व्यवसायावर कारवाई का होत नाही. यामागील गौडबंगाल काय? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
.तर मोठे रॅकेट उघड होणार!…
महामार्गावरील घाटा खालील हॉटेल, धाब्यांवर स्टीलचा काळाबाजार करणार्यांवर कारवाई केल्यास या अवैध व्यवसायात गुंतलेले मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरू असलेल्या व्यवसायावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
अधिकृत दुकानदारांवरही परिणाम !…
देवरी पोलिस्टेसन हद्दीतील महामार्गाच्या घाटाखाली सुरु असलेल्या धाब्यांवर स्टीलच्या काळ्या बाजारामुळे देवरी व सडक/अर्जुनी तालुक्यातील अधिकृत परवानाधारक दुकानदारांवरही त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. स्वस्त दरात स्टील मिळत असल्याने बांधकाम व्यावसायिक, बांधकाम करणारे तसेच इतर ग्राहक अधिकृत दुकानदाराकडून स्टील खरेदी न करता हॉटेल, धाब्यांवरूनच स्टील खरेदी करीत आहेत. त्याचा फटका अधिकृत दुकानदारांना बसत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे..









