गोंदिया : पोलीस अधीक्षक गोंदिया कार्यालयाचे 14 नोव्हेंबर 2024 चे पत्रानुसार जिल्ह्यात 18 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2024 या कालावधीत विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबीत मागण्या संदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्ता रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत. तसेच 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया व 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे संबंधाने आदर्श आचारसंहिता अंमलात असल्यामुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, गोंदिया यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत सन 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियम क्रमांक 22 चे कलम 37 (1) (3) अन्वये दिनांक 18 नोव्हेंबर पासून ते 2 डिसेंबर 2024 पर्यंत अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केले आहे. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
