गोंदिया : पोलीस अधीक्षक गोंदिया कार्यालयाचे 28 ऑक्टोबर 2024 चे पत्रानुसार जिल्ह्यात 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2024 या कालावधीत विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्ता रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत. तसेच 3 नोव्हेंबरला भाऊबीज, 15 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा व गुरुनानक जयंती साजरी करण्यात येणार आहे. तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 संबंधाने आदर्श आचारसंहिता अंमलात असल्याने जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, गोंदिया यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत सन 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियम क्रमांक 22 चे कलम 37 (1) (3) अन्वये दिनांक 3 नोव्हेंबर पासून ते 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केले आहे. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.









