जिल्ह्यातील 221 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान
गोंदिया : महाराष्ट्र राज्यात अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा नियुक्त्या मार्गी लावून राज्यात 10 हजार पेक्षा जास्त उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याचे कार्य शासनामार्फत करण्यात आले असून आज जिल्ह्यातील 221 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. शासन सेवेत नव्याने रुजू झालेल्या सर्व उमेदवारांनी जनतेची सेवा करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे कार्य लोकाभिमुख व पारदर्शी पध्दतीने करावे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
आज (ता.4) नविन नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालया गोंदिया येथे मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपवनसंरक्षक पवन जोंग, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, हा उपक्रम मुख्यमंत्री यांच्या सुशासन व पारदर्शक भरती प्रक्रियेच्या संकल्पनेशी सुसंगत असून जिल्ह्यातील युवकांना शासन सेवेत नवी दिशा व प्रेरणा मिळणार आहे. शासनाच्या प्राप्त सूचनेनुसार आज अनुकंपा तत्वावर व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियुक्ती झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश वितरीत करण्यात येत आहे, त्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो. शासन सेवेत अधिकाधिक चांगले काम करावे. शासन सेवेत नव्याने रुजू झालेल्या उमेदवारांकडून सर्वसामान्य जनेतेच्या गरजा लक्षात घेवून जनतेची लोकाभिमुख कामे होतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, शासन सेवेत नव्यानेच रुजू झालेल्या उमेदवारांना जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे, त्या संधीचे आपण सोने केले पाहिजे. शासन सेवेत प्रामाणिक व पारदर्शकपणे काम करावे. सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडविणे हे पुण्याईचे काम आहे. यावर्षी जिल्हा परिषद व इतर विभागात जवळपास 350 उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहे असे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक श्री. भामरे म्हणाले, शासनस्तरावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणे हे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होते. आता मुख्यमंत्र्यांच्या 150 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा तत्वावर आज नियुक्ती आदेश वितरीत करण्यात येत आहे. आज आपण शासनाच्या सेवेत प्रवेश करीत आहेत, त्यामुळे आपणास थेट जनतेमध्ये जावून लोकांची सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आपल्या पुढील सेवा काळात आपल्या हातून सर्वसामान्य जनतेला शासनाची चांगली सेवा मिळेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
उपवनसरंक्षक श्री. जोंग म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या 150 दिवसाच्या उपक्रमांतर्गत अनुकंपा तत्वावर उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरीत करण्यात येत आहे, ही नविन पिढील एक चांगली संधी आहे, या संधीचे सोने करावे. सर्वसामान्य जनतेचे आयुष्य सुखकर व्हावे यासाठी खारीचा वाटा द्यावा असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी अनुकंपा तत्वावर व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियुक्ती झालेल्या एकूण 7 उमेदवारांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करुन शासनाचे आभार मानले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात सचिन सोनवाने गट-ड (अनुकंपा), विजयकुमार मेश्राम गट-ड (अनुकंपा), अश्विनकुमार गजभिये गट-क (अनुकंपा), शिषिर भोयर गट-क (एम.पी.एस.सी.), स्नेहा मेश्राम गट-क (एम.पी.एस.सी.), योगेश भोगे गट-क (एम.पी.एस.सी.), अंकीत दोनोडे गट-क (एम.पी.एस.सी.), चंद्रकात वाट गट-क (एम.पी.एस.सी.), मुकेश चाकोटे गट-क (एम.पी.एस.सी.), प्रणाली देशमुख गट-क (एम.पी.एस.सी.), अश्विनी थोरात गट-क (एम.पी.एस.सी.), अमोल कस्तुरे गट-क (एम.पी.एस.सी.), मिलींद परशुरामकर गट-क (अनुकंपा), देवाशिष बिसेन वाहनचालक (अनुकंपा), शालु कावळे गट-क (अनुकंपा), शोयब खान गट-ड (अनुकंपा), वैभव गोहणे गट-क (एम.पी.एस.सी.), अपर्णा नुन्हारे गट-क (अनुकंपा), सिध्दी वालदे गट-क (अनुकंपा) यांना नियुक्ती आदेश वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार तहसिलदार समशेर पठाण यांनी मानले. कार्यक्रमास विविध विभागाचे नियुक्ती प्राधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









