खडकी(डोंगरगाव) परिसरात दहशतीचे वातावरण; वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
गोंदिया ( तिरोडा ) : तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) परिसरात दिनांक 9 जानेवारीला सकाळी रक्ताचा थरार अनुभवायला मिळाला. आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत एका चार वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याला बिबट्याने जबड्यात पकडून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण हल्ल्यात हियांश शिवशंकर रहांगडाले (वय ४ वर्ष) या बालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली असून वनविभागाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. हियांश हा नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या मागील अंगणात चुलीजवळ आई सोबत बसला होता. थंडीचे दिवस असल्याने घरात सकाळची लगबग सुरू होती. मात्र, घराच्या परिसरात दबा धरून बसलेल्या नरभक्षक बिबट्याची कुणालाही चाहूल लागली नाही. क्षणार्धात बिबट्याने हियांशवर झडप घातली आणि त्याला मानेला पकडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
बिबट्याने मुलाला उचलल्याचे पाहताच पालकांनी आरडाओरड केली. व पाठलाग केला. आरडा ओरडा ऐकून बिबट्याने मुलाला काही अंतरावर टाकून दिले आणि पसार झाला. परंतु, बिबट्याचा हल्ला इतका वर्मी होता की, गंभीर जखमांमुळे हियांशचा मृत्यू झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पोटच्या गोळ्याला पाहून पालकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.या घटनेनंतर खडकी (डोंगरगाव) परिसरात भीतीसह प्रचंड संतापाची लाट असून वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे रहांगडाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. प्रशासनाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, पीडित कुटुंबाला तात्काळ मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.









