सुरजागड प्रकल्पात विदर्भातील ट्रक मालकांना काम नाही; ‘फक्त कंपनीच्या गाड्यांनाच काम’ असल्याचा आरोप

गडचिरोली : सुरजागड येथील स्टील प्रकल्पामुळे गडचिरोलीसह संपूर्ण विदर्भातील नागरिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात विदर्भातील स्थानिक ट्रक मालक आणि वाहतूकदारांना पुरेसे काम मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजी वाढली आहे.

सुरजागड प्रकल्पासाठी वाहतूक व्यवसाय करण्याच्या उद्देशाने नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला तसेच गोंदिया जिल्ह्यातील अनेक ट्रक मालकांनी आपल्या गाड्या उपलब्ध करून देण्यासाठी तयारी केली होती. मात्र, ‘फक्त कंपनीच्या गाड्यांनाच काम दिले जाते’, असा आरोप विदर्भातील वाहतूकदारांकडून करण्यात येत आहे.

वाहतूकदारांच्या म्हणण्यानुसार, मोठ्या अपेक्षेने कर्ज काढून ट्रक खरेदी करण्यात आले. मात्र, अपेक्षेप्रमाणे काम मिळत नसल्याने वाहनांचे हप्ते, चालकांचा खर्च आणि इतर देखभाल खर्च भागवणे कठीण झाले आहे. त्यामुळे स्थानिक ट्रक मालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

रोजगाराचे आश्वासन कुठे गेले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाच्या औद्योगिक विकासामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे म्हटले होते. मात्र, स्थानिक वाहतूकदारांना जर कामच मिळणार नसेल, तर या विकासाचा फायदा नेमका कोणाला होणार? असा सवाल आता वाहतूकदारांकडून उपस्थित केला जात आहे.

“विदर्भातील युवकांना रोजगार मिळेल आणि वाहतूकदारांचा व्यवसाय वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र स्थानिक वाहतूकदारांना डावलून केवळ कंपनीच्या वाहनांनाच काम मिळत असेल, तर हा विकास नेमका कोणासाठी?” असा प्रश्न वाहतूकदारांनी उपस्थित केला आहे.

स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी

विदर्भातील संसाधने आणि येथील प्रकल्पांचा लाभ सर्वप्रथम स्थानिक नागरिकांना आणि स्थानिक व्यावसायिकांना मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे. सुरजागड प्रकल्पाच्या वाहतूक व्यवस्थेत विदर्भातील स्थानिक ट्रक मालकांना योग्य संधी देऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी वाहतूकदारांकडून करण्यात येत आहे.

रोजगार हवा, आमच्या गाड्यांना काम द्या; फक्त कंपनीच्या गाड्यांना नाही,” अशी भूमिका विदर्भातील वाहतूकदारांनी घेतली आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!