राघोजी भंगारे बक्षीस योजनेअंतर्गत आश्रमशाळेतील 12 वी, 10 वी प्रकल्प स्तरीय प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना गुणगौरव..
गोंदिया ( देवरी ) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरीता दिनांक 1 मे पासून आयोजित उन्हाळी सराव शिबिराचा समारोपिय समारंभ व इयत्ता 10 वी, 12 वी मध्ये प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा “राघोजी भांगरे गुणगौरव” सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये पार पडला.
येथे विद्यार्थ्यांनी एक महिन्यामध्ये तयार केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन व विक्री भरविण्यात आलेले होते तसेच रांगोळी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मागील 3 दिवसापासून क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त त्यांची 30 फूट रांगोळी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे रेखाटून एका अनोख्या पद्धतीने त्यांना अभिवादन केले. या सर्व कलाकृती बघून सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे भरभरून कौतुक केले विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीतून 25 हजार पर्यंत रुपये प्राप्त झाले हे विशेष तसेच प्रकल्प अधिकाऱ्यांनी राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाची स्तुती केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथि म्हणून श्री राजकुमार बडोले आमदार, मोरगाव अर्जुनी विधानसभा, श्री लायकराम भेंडारकर जिल्हा परिषद अध्यक्ष, श्री प्रजित नायर जिल्हाधिकारी गोंदिया, श्री सुरेश हर्षे उपाध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया, सौ रजनी कुंभरे सभापती जिल्हा परिषद गोंदिया ,श्री चेतन वडगाये सभापती पंचायत समिती सडक अर्जुनी व जात पडताळणी समितीचे सुरेश रामटेके वरिष्ठ संशोधन अधिकारी, श्री उमेश काशीद प्रकल्प अधिकारी देवरी हे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सरकारी पैशाचा यापेक्षा चांगला उपयोग होऊ शकत नाही असे सांगितले. मुलांच्या मध्ये असलेल्या ऊर्जेचा अगदी योग्य वापर करून प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांनी समर कॅम्पचे उत्तम पद्धतीने नियोजन व अंमलबजावणी केली याबद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
तर आमदार राजकुमार बडोले यांनी आदिवासी विद्यार्थी कुठेही कमी नाही हे या उन्हाळी शिबिरातून दिसून आल्याचे सांगितले तसेच अशा पद्धतीची प्रगती आपल्याला शिक्षणात करावी लागेल शिक्षणामुळेच आपण आपली आणि समाजाची प्रगती करू शकतो असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. आमदार संजय पुराम यांनी बोलताना सांगितले की आदिवासी विद्यार्थ्यांनी आता अश्या खुर्चीवर जाऊन बसावे जिथून त्यांना वयाच्या 60 वर्षापर्यंत कोणीही हटवू शकणार नाही. आदिवासी विद्यार्थ्यांनी मनातला न्यूनगंड बाजूला सारून ओपनच्या मुलांसोबत स्पर्धा करावी प्रशासकीय सेवेत दाखल होऊन आपल्या समाजाची सेवा करावी.
शासकीय आश्रमशाळा बोरगाव, कडीकसा, पुराडा, मजीतपुर जमाकुडो व कोयलारी तर अनुदानित आश्रमशाळा मेंढा, कामठा, नवेगाव धापे व ठाणा या शाळांचा इयत्ता दहावीचा तर तसेच शासकीय आश्रमशाळा बोरगाव, जमाकुडो व अनुदानित आश्रमशाळा केशोरी, सिरेगाव बांध या शाळांचा इयत्ता 12 वी चा निकाल 100 टक्के लागला. या शाळांना आणि शाळा व्यवस्थापन समिती यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये प्रकल्पातून प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या मुला- मुलींना “राघोजी भांगरे गुणगौरव पुरस्कार” व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
उन्हाळी सराव शिबिरातील मेहंदी क्ले-आर्ट,रांगोळी, गोंडी- चित्रकला, बांबू-आर्ट, संगीत आणि ॲथलेटिक्स मधील प्रथम येणाऱ्या प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सोबतच या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांना सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या सर्व उपक्रमामध्ये प्रकल्प कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी,सर्व कर्मचारी, मुख्याध्यापक, गृहपाल यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने समर कॅम्प यशस्वी झालेचे दिसून आले. आभार शिरीष सोनवणे यांनी मानले तर सूत्रसंचालन दीपेश मांडे यांनी केले.
*समर कॅम्प मधून आदिवासी मुलांच्या कलेला वाव देण्यात आला तसेच शैक्षणिक मध्ये आज नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मध्ये आश्रमशाळेतील तीन विदयार्थ्यांची निवड झाली असून आदिवासी पालकांनी आश्रमशाळेत आपल्या मुलांचे प्रवेश घ्यावेत.*
उमेश काशिद
प्रकल्प अधिकारी
इयत्ता 10 वी व 12 वी कला व विज्ञान शाखेतील प्रकल्पातून प्राविण्य प्राप्त करणाऱ्या या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
इयत्ता 10 वी मध्ये प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी
1. पुनम प्रमोद परतेती अनुदानित आश्रम शाळा मेंढा
2. स्वाती रमेश कुंभरे अनुदानित आश्रम शाळा मेंढा
3. शीतल संजय मडावी शासकीय आश्रम शाळा कोयलारी
इयत्ता 10 वी मध्ये प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी
1. पियुष दिलीप उईके अनुदानित आश्रम शाळा मेंढा
2. निलेश किसनलाल राऊत अनुदानित आश्रम शाळा मेंढा
3. अमित प्रकाश भूरकुडे अनुदानित आश्रम शाळा पिंपरिया
इयत्ता 12 वी विज्ञान मध्ये प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी
1. श्रुती लक्ष्मीशंकर मरकाम शासकीय आश्रम शाळा पुराडा
2. आकांक्षा देवराम कुंभरे शासकीय आश्रम मजितपूर
3. सलोनी देवाजी पुराम शासकीय आश्रम शाळा मजितपूर
इयत्ता 12 वी विज्ञान मध्ये प्राविण्य प्राप्त करणारे विद्यार्थी
1. किशोर मिथिलेश कमरो अनुदानित आश्रम शाळा सिरेगाव बांध
2. दीपक दामेसाय हुर्रा अनुदानित आश्रम शाळा सिरेगाव बांध
3. अंकित बकाराम हिडामी शासकीय आश्रम शाळा कडीकसा
इयत्ता 12 वी कला मध्ये प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी
1. शुभांगी महारू कसोंडी शासकीय आश्रम शाळा बोरगाव
2. सपना ईश्वरदास सलामे शासकीय आश्रम शाळा बोरगाव
3. सुनीताबाई आनंदराव कोराम शासकीय आश्रम शाळा बोरगाव
4. पुनम सुरेश काटेवार शासकीय आश्रम शाळा मजितपूर
5. पुनम ग्यानीराम वट्टी शासकीय आश्रम शाळा मजितपूर
इयत्ता 12 वी कला मध्ये प्राविण्य प्राप्त करणारे विद्यार्थी
1. मोहित शांताराम मडावी अनुदानित आश्रम शाळा कोकणा
2. रुपेश कुमारसाय मडावी शासकीय आश्रम शाळा कडीकसा
3. विकास शंकर मडावी अनुदानित आश्रम शाळा केशोरी









