२७ जणांवर गुन्हे दाखल; १५ डी.जे. सिस्टिम, मिक्सर आणि वाहने पोलिसांच्या ताब्यात
गोंदिया : ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून उच्च डेसिबलच्या आवाजात डी.जे. वाजवणाऱ्या साऊंड चालक, मालक आणि आयोजकांवर गोंदिया पोलिसांनी जोरदार कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसांत जिल्हभरात केलेल्या धडक कारवायांमध्ये पोलिसांनी तब्बल १५ गुन्हे दाखल करत २७ आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे. या कारवाईत डी.जे. सिस्टिमचे बेस, टॉप, मिक्सर आणि वाहनांसह तब्बल ५३ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंदियाचे पोलीस अधीक्षक गौरख भामरे यांनी डी.जे. चालक आणि मालकांची बैठक घेऊन सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या ध्वनी प्रदूषण नियमांचे काटेकोर पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक ठिकाणी कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात डी.जे. वाजवणाऱ्यांवर अखेर पोलिसांनी थेट कारवाईचा दणका दिला.
कुठे-कुठे झाली कारवाई?
• गोंदिया शहर (हनुमान चौक, लोधीटोला): डोंगरगाव येथील डी.जे. मालक दुर्गेश तुरकर, लोधीटोला येथील आयोजक निखिल लिल्हारे आणि वाहन चालक लितेश सोनवणे यांच्याकडून मोठ्या क्षमतेची साऊंड सिस्टिम, २० भोंगे, ४ बेस आणि चारचाकी वाहनासह ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
• रामनगर (गोंडीटोला चौक): भानपूर येथील डी.जे. मालक निखिल चिल्लोरे यांच्याकडून २ बेस, २ टॉप, मिक्सर मशीन व टाटा चारचाकी वाहनासह २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
• अर्जुनी मोरगाव (अरुणनगर): चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील अनिल डोये, उमेश गाडे, अमोल राऊत, गणेश मस्के, लोकेश मानकर, गुरुदेव डोंगरवार आणि सुनील सिंग या ७ जणांवर कारवाई करत २ वाहने, जनरेटर व साऊंड साहित्यासह १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
• तिरोडा: रतनारा येथील रिषभ ढेकवर याच्याकडून ४ बेस, ४ टॉप, शार्पी लाईट्स आणि आयशर वाहनासह ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.
• आमगाव (गांधी चौक): किक्रीपार येथील मोरेश्वर मेंढे याच्याकडून ७ हजार रुपयांची साऊंड सिस्टिम जप्त.
• गंगाझरी (बीबीटोला): सुनील तुरकर याच्याकडून ५० हजार रुपयांचे साऊंड साहित्य जप्त.
पोलिसांचे गणेश मंडळांना व डी.जे. मालकांना कडक आवाहन
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि सर्वसामान्य नागरिक, रुग्ण व वृद्धांना त्रास होऊ नये, यासाठी सर्व गणेश मंडळे आणि डी.जे. मालकांनी ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे आणि वेळेच्या मर्यादेचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
> मार्गदर्शन व कारवाई पथक:
सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक गौरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे (कॅम्प देवरी), उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला (गोंदिया), गजानन गुल्हाने (तिरोडा) आणि नंदिनी चनपूरकर (आमगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर, रामनगर, तिरोडा, आमगाव, अर्जुनी मोरगाव व गंगाझरी पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांसह कर्मचाऱ्यांनी केली.








