गोंदिया : जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून एका ५८ वर्षीय वृद्धाची कुऱ्हाड आणि हातोड्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गंगाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंडीपार एमआयडीसी परिसरात घडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अत्यंत तत्परतेने तपास करत या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांच्या आत उलगडा केला असून दोन मुख्य आरोपींसह दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे.
रविशंकर उदेलाल रहांगडाले (वय ५८, रा. मुंडीपार) असे मृतकाचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी रात्री ७:४५ वाजेच्या सुमारास रविशंकर हे आपल्या दुचाकीने व्यंकटेश राईस मिलमध्ये रात्रपाळीच्या कामावर जात होते. दरम्यान, एमआयडीसी रोडवरील चमडा फॅक्टरीजवळ अंधारात दबा धरून बसलेल्या आरोपींनी स्प्लेंडर दुचाकीने त्यांचा पाठलाग केला. त्यांना रस्त्यात अडवून आधी हातोड्याने पाठीवर वार करून गाडीवरून खाली पाडले, आणि त्यानंतर कुऱ्हाडीने डोक्यावर जबर वार करून त्यांची निर्घृण हत्या केली.
या प्रकरणी मृतकाचा मुलगा विक्की रहांगडाले (वय ३१) याच्या तक्रारीवरून गंगाझरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३(१) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
असा झाला गुन्ह्याचा उलगडा:
घटनेचे गांभीर्य ओळखून गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात पथकाने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मृत रविशंकर हे जादूटोणा करत असल्याचा संशय गावात होता आणि काही लोकांचा त्यांच्यावर तीव्र राग होता.
या माहितीच्या आधारे पथकाने संशयित कमलेश नेवारे याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संशयिताच्या घरातील दोन व्यक्तींचा मृत्यू आणि इतर सदस्यांची सतत आजारपण, तसेच गावातील इतर काहींच्या घरातील मृत्यू हे रविशंकर यांच्या जादूटोण्यामुळेच झाल्याचा पक्का समज आरोपींचा झाला होता. याच रागातून कमलेश नेवारे, जितेंद्र कोहळे आणि दोन अल्पवयीन मुलांनी मिळून रविशंकर यांच्या हत्येचा कट रचला होता.
आरोपी पोलिसांच्या तावडीत:
स्थानिक गुन्हे शाखेने तत्परतेने कारवाई करत जितेंद्र कोहळे (वय ४५) आणि कमलेश अशोक नेवारे (वय १९, दोघेही रा. टॉवरटोली, मुंडीपार) यांच्यासह दोन बालकांना ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना गंगाझरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (तिरोडा) गजानन गुल्हाणे व एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमरदीप खडे, सपोनि जंगमवार, गंगाझरीचे ठाणेदार धीरज राजूरकर, सायबर सेल व एलसीबीच्या अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.









