रेती उपशाचा गुन्हा न दाखल करण्यासाठी २० हजारांची लाच मागणारा वनपाल एसीबी चे जाळ्यात; दोन वनरक्षकही ताब्यात!

एसीबी गोंदिया पथकाची धडक कारवाई: गोठणगाव वनपरिक्षेत्रातील पारसटोला कार्यालयातील घटना

गोंदिया ( किशोरी, गोटणगाव ) : घराच्या बांधकामासाठी आणलेल्या वाळूवर रेती उपसा व वाहतुकीची दंडात्मक कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना राजुली/पारसटोला वनपरिक्षेत्रातील वनपाल रमेश सखारामजी पचारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) गोंदियाच्या पथकाने मंगळवारी (११ ऑगस्ट) रंगेहात पकडले. या धडक कारवाईत घटनास्थळी उपस्थित असलेले वनरक्षक निलोत्पल शिकारे व वनरक्षक चिंटू परिहार या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून तिघांविरुद्ध किशोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय तक्रारदार तरुण हे आपल्या घराचे बांधकाम करत आहेत. मार्च २०२६ मध्ये ते घरासाठी लागणारी रेती गावाशेजारील नाल्यातून आणत असताना वनपाल रमेश पचारे यांनी त्यांचा ट्रॅक्टर अडवून कारवाईची धमकी दिली व कारवाई न करण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
त्यानंतर दिनांक ९ जुलै २०२६ रोजी तक्रारदार हे रॉयल्टीची वाळू घरात टाकून रिकामे ट्रॅक्टर शेताकडे घेऊन जात असताना वनपाल पचारे व वनरक्षक शिकारे यांनी पुन्हा ट्रॅक्टर अडवून ट्रॅक्टरची चावी काढून घेतली. “बांधकाम सुरू केल्यापासून तू एकही रुपया दिला नाहीस, तुझ्यावर गुन्हा दाखल करतो” अशी धमकी देऊन पुन्हा २५ हजार रुपयांची मागणी केली.
दरम्यान, ५ ऑगस्ट २०२६ रोजी वनपाल पचारे यांनी तक्रारदारास ८ ऑगस्ट रोजी पारसटोला राऊंड ऑफिस येथे हजर राहण्याबाबत नोटीस बजावली. तक्रारदार ८ ऑगस्ट रोजी कार्यालयात हजर झाले असता, पचारे व शिकारे यांनी २५ हजार रुपयांऐवजी २० हजार रुपयांत ‘सेटलमेंट’ करण्याचे ठरवले.
एसीबीची पडताळणी व रंगेहात सापळा कारवाई
तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी १० ऑगस्ट २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे जाऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे ११ ऑगस्ट २०२६ रोजी एसीबी पथकाने पंचांसमक्ष पारसटोला कार्यालय परिसरात लाच मागणीची पडताळणी केली. पडताळणी दरम्यान आरोपी क्र. १ वनपाल पचारे, आरोपी क्र. २ वनरक्षक शिकारे व आरोपी क्र. ३ वनरक्षक परिहार या तिघांनीही गुन्हा न नोंदवण्यासाठी २०,०००/- रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
त्यानंतर तात्काळ रचलेल्या सापळ्यात तक्रारदारास लाचेची रक्कम घेऊन कार्यालयात पाठवले असता, आरोपी वनपाल रमेश पचारे यांनी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबी पथकाने झडप घालून त्यांना रंगेहात पकडले. यावेळी समक्ष हजर असलेले वनरक्षक निलोत्पल शिकारे व चिंटू परिहार यांनाही तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेले आरोपी लोकसेवक:
श्री. रमेश सखारामजी पचारे (वय ५७ वर्ष)
   पद: वनपाल, राजुली सावनक्षेत्र, गोठणगाव वनपरिक्षेत्र, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया.
   (मूळ रा. आष्टी, जि. वर्धा | ह.मु. किशोरी, जि. गोंदिया)
श्री. निलोत्पल हिरालाल शिकारे (वय ३१ वर्ष)
   पद: वनरक्षक, पारसटोला, गोठणगाव वनपरिक्षेत्र, ता. अर्जुनी मोरगाव.
   (रा. शासकीय निवासस्थान, किशोरी, जि. गोंदिया)
चिंटू मंगलसिंग परिहार (वय ३८ वर्ष)
   पद: वनरक्षक, राजुली सावनक्षेत्र, गोठणगाव वनपरिक्षेत्र, ता. अर्जुनी मोरगाव.
   (रा. टीचर कॉलनी, किशोरी, जि. गोंदिया)
तपास व कारवाई पथक:
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी बाविस्कर व अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय माहुलकर (ला.प्र.वि. नागपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी (पर्यवेक्षक अधिकारी) आणि पोलीस निरीक्षक उमाकांत उगले (सापळा अधिकारी) यांच्या नेतृत्वात पोनि अरविंद राऊत, सहाय्यक फौजदार करपे, हवालदार बोहरे, कहालकर, पोलीस अंमलदार शेंडे, बोपचे, कापसे, काटकर, सोनवणे, बाटबर्वे, पटले व डांगे यांनी पार पाडली.
📢 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन:
कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाच न देता खालील पत्त्यावर किंवा संपर्क क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा:
टोल फ्री हेल्पलाइन: १०६४
 एसीबी गोंदिया कार्यालय: तिरोडा रिंग रोड, रेल्वे गेट जवळ, गोंदिया.
 दूरध्वनी / व्हॉट्सॲप: ०७१८२-२५१२०३ / ९२०९०४१०६४ | ई-मेल: acbgondia@gmail.com
 एसीबी नागपूर परिक्षेत्र: ०७१२-२५६१५२० / ९०६७६७१०६४

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!