पिपरखारीत पोलिसांच्या वतीने ‘दिवाळी मिलन’ उत्साहात संपन्न; नक्षलग्रस्त भागातील १४५ आदिवासी बांधवांना साहित्याचे वाटप

गोंदिया ( चिचगढ़ ) : गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे ‘दादालोरा पोलीस खिडकी’ योजनेअंतर्गत नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या सीमेलगतच्या पिपरखारी येथे ‘दिवाळी मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गोंदिया जिल्हा पोलीस दल आणि नागपूरच्या ‘माऊली सेवा संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची दिवाळी गोड झाली असून, पोलीस प्रशासनाच्या या मानवीय चेहऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलीस अधीक्षक गोरख भांबरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे (कॅम्प देवरी) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत लागून असलेला आणि कायम नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिपरखारीसह गौरीटोला, महाजनटोला आणि पुरामटोला या परिसरातील ग्रामस्थ, महिला व लहान मुले मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

आदिवासी बांधवांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप
या ‘दिवाळी मिलन’ सोहळ्यात परिसरातील सुमारे १४५ गरीब आदिवासी बांधव व महिलांना साडी, ब्लॅंकेट, मिठाई, चिवडा तसेच इतर जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. गडचिरोली सीमेवरील या दुर्गम भागात पोलिसांकडून अशा प्रकारचे लोकोपयोगी उपक्रम राबवून आदिवासी बांधवांमध्ये पोलिसांविषयी विश्वास, आपुलकी आणि जनमानसात सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.

मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास ‘माऊली सेवा संघ’ नागपूरचे सुहास खरे व त्यांची संपूर्ण टीम, चिचगड पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्धन हेगडकर, एओपी पिपरखारीचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक नेताम, चिचगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जाटवे, तसेच पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार आणि मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमाबद्दल मनःपूर्वक आभार मानले असून, या अनोख्या दिवाळी मिलन सोहळ्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!