सोशल मीडियावर व्हायरल फोटो खोटा असल्याचे स्पष्ट – वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी धोते मिश्रा यांचे नागरिकांना आवाहन
गोंदिया ( देवरी ) : देवरी शहरातील MIDC परिसरात सायंकाळी 7.30 वाजता वाघ दिसल्याची बातमी व त्यासोबत व्हायरल होत असलेला वाघाचा फोटो हा पूर्णपणे खोटा आणि AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) द्वारे बनवलेला असल्याचा खुलासा देवरी वन विभागाने केला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची अथवा अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी धोते मिश्रा यांनी केले आहे.
आज सायंकाळी 7.30 वाजतापासून सोशल मीडियावर देवरीच्या MIDC परिसरात वाघाचे दर्शन झाल्याचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रात्रीच्या अंधारात कुंपणावरून वाघ जात असल्याचे दाखवले आहे. या बातमीमुळे शहरातील नागरिकांमध्ये, विशेषतः रात्री कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत देवरी वनविभागाने तात्काळ MIDC परिसराची पाहणी केली. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी वाघाच्या पायाचे ठसे, विष्ठा किंवा इतर कोणताही पुरावा शोधला असता, तेथे वाघाच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा आढळून आला नाही. तसेच व्हायरल फोटोची तांत्रिक तपासणी केली असता तो AI टूलने तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
वनविभागाचे आवाहन –
याबाबत बोलताना वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी धोते मिश्रा, “देवरी शहरातील नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. व्हायरल होत असलेला वाघाचा फोटो खोटा आहे. कोणीतरी खोडसाळपणे AI द्वारे फोटो बनवून अफवा पसरवली आहे. आमचे पथक सतत गस्त घालत आहे. नागरिकांनी अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये.”
दरम्यान, अशा प्रकारे खोट्या बातम्या व फोटो व्हायरल करून जनतेत भीती पसरवणाऱ्यांवर वनविभाग व पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.








