देवरीत अग्रवालच्या अवैध रेती साठ्यावर 10 दिवसांनंतरही कारवाई नाही; तहसीलदारांची सारवासारव

‘तलाठी अहवाल बाकी’ सांगून टाळाटाळ, नागरिकांचा संताप; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीचा इशारा

गोंदिया ( देवरी ) : देवरी शहरातील चिचगड रोड लगत अवैधरित्या साठवलेल्या व विक्री होत असलेल्या शेकडो ब्रास रेतीच्या साठ्यावर 10 दिवस उलटूनही देवरी महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. यामुळे तहसील प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

12 जूनला तक्रार, पुरावे देऊनही कारवाई नाही
देवरीतील रेती व्यापारी शंभु अग्रवाल याने चिचगड रोडवरील मोकळ्या जागेत कोणतीही परवानगी नसताना मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा केला. तक्रारदाराने 12 जून रोजी GPS लोकेशनसह फोटो व व्हिडिओ पुरावे जोडून तहसील कार्यालयात लेखी तक्रार दिली. मात्र 10 दिवस उलटूनही साठा जप्तीची व दंडात्मक कारवाई झाली नाही.

तहसीलदारांची उडवाउडवी
याबाबत विचारणा केली असता तहसीलदार प्रणया भालेकर यांनी, *“तलाठी अहवाल अजून येणे आहे. अहवाल आला की कारवाई करू,”* असे उत्तर दिले. प्रत्यक्षात घटनास्थळी पंचनामा करून तलाठ्यांनी अहवाल आठवड्यापूर्वीच सादर करणे अपेक्षित होते. “वरिष्ठांचा धाक तलाठ्यांना नाही,” असे सांगत तहसीलदारच टाळाटाळ करत असल्याने जाणीवपूर्वक अग्रवालची पाठराखण होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

‘मोठ्यांना अभय, सामान्यांना दंड’
“सर्वसामान्याने एक ट्रॉली रेती आणली तर तत्काळ दंड होतो. मात्र मोठ्या व्यापाऱ्याचा शेकडो ब्रासचा साठा उघड्यावर दिसत असूनही कारवाई नाही. हे कोणाच्या आशीर्वादाने?” असा सवाल नागरिक विचारत आहेत. हा प्रकार सध्या देवरी शहरात चर्चेचा विषय बनला आहे.

तात्काळ कारवाईची मागणी, आंदोलनाचा इशारा
रेती साठा तात्काळ जप्त करून संबंधित अग्रवालवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा. तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदार व नागरिकांनी केली आहे. कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी व महसूल मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया:
_“तलाठी अहवाल अजून येणे आहे. अहवाल आला की कारवाई करू.”_ 
प्रणया भालेकर, तहसीलदार, देवरी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें