प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यास 13 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

अंतिम मतदार यादी 30 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार

गोंदिया : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्याची मुदत आता 13 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. त्यामुळे मतदारांना प्रारूप मतदार यादीतील आपल्या नावाची व तपशिलांची पडताळणी करून आवश्यक दुरुस्त्यांसाठी दावे व हरकती दाखल करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
            भारत निवडणूक आयोगाने 14 मे 2026 रोजी दिलेल्या पत्रानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला असून, महाराष्ट्रात या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने दावे व हरकती दाखल करण्यासाठी आयोगाने आता 30 ऑक्टोबर 2026 रोजी पत्रान्वये मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
           सुधारित कार्यक्रमानुसार, प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी 31 ऑगस्ट ते 13 नोव्हेंबर 2026 असा निश्चित करण्यात आला आहे. तसेच प्राप्त दावे व हरकतींची छाननी, नोटीस बजावण्याची प्रक्रिया आणि त्यांचा निपटारा 31 ऑगस्ट ते 25 नोव्हेंबर 2026 या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर 30 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
           मतदार यादीतील नाव, पत्ता तसेच अन्य तपशिलांमध्ये काही त्रुटी असल्यास त्या वेळेत निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव व संबंधित तपशिलांची पडताळणी करावी. विहित मुदतीत दावे व हरकती दाखल करून मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी विजय अवधाने यांनी केले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!