गोंदिया : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने सलग तीन दिवस धडक कारवाई सत्र राबवले आहे. वैनगंगा नदी आणि नाल्याच्या पात्रातून बेकायदेशीरपणे वाळूची चोरी करून वाहतूक करणाऱ्या ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ५ ट्रॅक्टर, १ टिप्पर आणि ७ ब्रास वाळू असा एकूण ५० लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईचा सविस्तर तपशील:
• दवनीवाडा हद्द (१४ सप्टेंबर) : महालगाव ते रतनारा मार्गावर नाकाबंदीदरम्यान २ ट्रॅक्टर पकडण्यात आले. वैनगंगा नदीपात्रातून चोरलेली २ ब्रास वाळू आणि २ ट्रॅक्टरसह १५,१२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी राजकुमार नैताम नागपुरे (वय ३०, रा. महालगाव) आणि जितेंद्र तिलकचंद ठाकरे (वय ४४, रा. देवरी) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.
• रावणवाडी हद्द (१५ सप्टेंबर): तेढवा ते काटी रोडवर १ ट्रॅक्टर आणि १ टिप्पर थांबवून तपासणी केली असता ३ ब्रास वाळू आढळली. वाहनांसह २१,१८,००० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालक व मालक खिलेंद्र रामकिशोर म्हात्रे (२९, रा. मरारटोला), प्रदीप खुशाल भुरे (२२, रा. पांढराबोडी), राहुल राजू उईके (२५, रा. सलाईटोला) आणि यश राधेश्याम लिल्हारे (रा. गद्दाटोली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
• डुग्गीपार हद्द (१६ सप्टेंबर): सलाईटोला ते चिरचाळी मार्गावर २ ट्रॅक्टरद्वारे उमरझरी नाल्यातून २ ब्रास वाळूची अवैध वाहतूक उघडकीस आली. १२,१२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी आशिष राजकुमार राऊत (२८, रा. डव्वा) व मेघनाथ सखाराम उंदीरवाडे (५३, रा. डव्वा) यांना ताब्यात घेण्यात आले.
कारवाई करणारे पथक:
पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशाखाली आणि एलसीबी निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार संजय चव्हाण, सोमेंद्रसिंग तूरकर, रियाज शेख, दीक्षितकुमार दमाहे, सुबोध बिसेन, इंद्रजित बिसेन, तुलसीदास लुटे, दुर्गेश तिवारी, छगन विठ्ठले, सुनील डहाके, निखिल मेश्राम, राकेश इंदूरकर आणि विलेश ठाकरे यांनी ही यशस्वी कामगिरी बजावली.









