गोंदिया ( सडक अर्जुनी ) : मौजा पाटेकुर्रा येथे वाघाच्या भीषण हल्ल्यात एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. श्री वातू बकाराम राऊत ( वय ७२ झुरकुटोला तालुका सडक अर्जुनी ) असे मृतकाचे नाव आहे. या घटनेमुळे पाटेकुर्रा व परिसरात प्रचंड घबराट पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटेकुर्रा बफर बीटला लागून असलेल्या गावाजवळील शेतीशेजारील ‘एफडीसीएम’च्या (FDCM) कक्ष क्रमांक ४२४ आरएफ (RF) जंगल परिसरात वातू राऊत हे गेले असताना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सडक अर्जुनी वन्यजीव विभागाचे मा. वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यासह सर्व क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक आणि वनमजूर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी स्वतः प्रत्यक्ष हजर राहून परिस्थिती हाताळली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वनविभागाच्या पथकाने एफडीसीएम (FDCM) आणि पोलीस कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत पुढील पंचनामा व कागदोपत्री कारवाई पूर्ण केली.
गावालगतच्या शेती परिसरातच वाघाचा वावर असल्याने बफर क्षेत्रातील शेतकरी व ग्रामस्थ दहशतीखाली आहेत. वन्यजीवांचा बंदोबस्त करण्यात यावा आणि मृतकाच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.








