गोंदिया : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख असलेल्या गणेशोत्सवाला आता राष्ट्रीय सीमांच्या पलीकडे जागतिक व्यासपीठावर नेण्यासाठी व्यापक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून दर्जा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या गणेशोत्सव परंपरेचे आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक, कलात्मक आणि लोकपरंपरागत वैभव जगासमोर प्रभावीपणे मांडण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर माहिती व जनसंवाद मोहीम राबविण्यात येणार आहे.
गणेशोत्सव म्हणजे केवळ सार्वजनिक मंडळांच्या भव्य सजावटी किंवा देखाव्यांचा उत्सव नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाशी आणि लोकसंस्कृतीशी घट्ट जोडलेली समृद्ध परंपरा आहे. घराघरातील गणपतीपासून ते अनेक पिढ्यांपासून जपल्या जाणाऱ्या कौटुंबिक परंपरा, स्थानिक गणेशोत्सव मंडळांच्या सामाजिक उपक्रमांपासून ते मूर्तिकला, हस्तकला, संगीत, नृत्य, लोककला आणि खाद्यपरंपरांपर्यंतचा हा सांस्कृतिक वारसा जगासमोर नेण्याचा प्रयत्न या मोहिमेतून केला जाणार आहे.
गोंदियाच्या गणेशोत्सवातील ‘आपली’ ओळख जगासमोर आणण्याचे आवाहन
गोंदिया जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सवांचा शोध घेऊन त्यांचे दस्तावेजीकरण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांबरोबरच छोट्या मंडळांचे, घरगुती गणपतींचे तसेच अनेक वर्षांपासून परंपरेने साजरे होणाऱ्या गणेशोत्सवांचे संकलन केले जाणार आहे.
या अंतर्गत गणेशोत्सवाशी संबंधित ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि कलात्मक वैशिष्ट्यांची माहिती, छायाचित्रे, व्हिडिओ, मुलाखती तसेच नागरिकांच्या आठवणी आणि अनुभव संकलित केले जाणार आहेत. स्थानिक कलाकार, मूर्तिकार, कारागीर, हस्तकलावंत आणि लोककलाकार यांच्या योगदानालाही या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी मिळणार आहे.
एका क्लिकवर महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा
गणेशोत्सवाशी संबंधित संकलित माहिती ‘bappa.org’ या अधिकृत डिजिटल मंचाशी जोडण्यात येणार आहे. या माध्यमातून गोंदियासह राज्यातील विविध जिल्ह्यांच्या गणेशोत्सव परंपरांचा एक व्यापक आणि कायमस्वरूपी डिजिटल सांस्कृतिक दस्तावेज तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.
आजच्या डिजिटल युगात स्थानिक परंपरेचे दस्तावेजीकरण ही केवळ प्रसिद्धीची बाब नसून पुढील पिढ्यांसाठी सांस्कृतिक वारसा जतन करण्याची संधी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक, गणेश मंडळे, कलाकार, कारागीर, सांस्कृतिक संस्था आणि गणेशभक्तांनी आपल्या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सवाची माहिती, छायाचित्रे, व्हिडिओ आणि आठवणी या मोहिमेशी जोडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
गोंदियाची संस्कृती, महाराष्ट्राचा अभिमान आणि जगासाठी सांस्कृतिक ठेवा
गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची एकात्मता, सामाजिक सहभाग, लोककला, उद्यमशीलता आणि सांस्कृतिक विविधता जगासमोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे. युनेस्कोसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानांकने व गौरव प्राप्त करण्याच्या व्यापक उद्दिष्टाच्या दिशेने जिल्ह्याच्या पातळीवरून होणारे हे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सव, प्रत्येक कलाकाराची कला, प्रत्येक कुटुंबाची परंपरा आणि प्रत्येक नागरिकाच्या आठवणीतला ‘बाप्पा’ हा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या अनोख्या परंपरांना जगाच्या व्यासपीठावर पोहोचविण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सार्वजनिक स्थापना झालेल्या गणेशोत्सवांना जिल्हा माहिती कार्यालयाकडून आवाहन करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या गणेशोत्सवाची माहिती द्यावी.









