गोंदिया : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने २०२६ सालासाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम हाती घेण्यात आला असून पात्र मतदारांची नावे समाविष्ट करणे आणि अपात्रांची नावे वगळणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी नागरिकांना या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
या मोहिमेनुसार ३० जून ते २९ जुलै दरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) प्रत्येक घरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेणार आहेत. तसेच BLO किमान तीन वेळा भेट देणार असल्याने नागरिकांनी योग्य व अचूक माहिती देणे अपेक्षित आहे.
५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यानंतर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. नागरिकांना नमुना ६, ७ आणि ८ द्वारे आपली मागणी नोंदवता येणार आहे.
यानंतर ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर या कालावधीत प्राप्त हरकतींवर सुनावणी होईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
दरम्यान, नागरिकांसाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. voters.eci.gov.in या संकेतस्थळावर गणना प्रपत्र भरता येणार असून २००२ सालच्या SIR मधील नावेही ऑनलाइन शोधता येतील.
गणना प्रपत्र भरताना जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, मतदार ओळखपत्र क्रमांक, तसेच आई-वडील किंवा पती/पत्नीचे नाव देणे आवश्यक आहे.
नागरिकांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक १९५० तसेच ०७१८२-२३६१४८ उपलब्ध करून देण्यात आला आहे.
“आपले सहकार्य, देशाचा अभिमान – एकही मतदार राहणार नाही वंचित,” असा संदेश देत प्रशासनाने सर्व नागरिकांना या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री पत्की यांनी केले आहे.









