‘ओळख गोंदिया जिल्ह्याची’ माहिती पुस्तिकेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन

जिल्ह्याचा इतिहास, संस्कृती, पर्यटन, कृषी, वनसंपदा आणि विकासाचा सर्वांगीण आढावा

           गोंदिया : जिल्ह्याचा ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक वारसा तसेच विकासाची विविध क्षेत्रांतील वाटचाल सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘ओळख गोंदिया जिल्ह्याची’ या माहितीपर पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
          याचे पुनरप्रकाशन शुक्रवारी सायंकाळी जिल्हा माहिती कार्यालयात ‘ओळख गोंदिया जिल्ह्याची’ पुस्तकीमध्ये लिहिणाऱ्या लेखकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अंजु निमसरकर, संपादक पत्रकार खेमेंद्र कटरे, अतुल दुबे, एस.एस. जायस्वाल महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथील प्राध्यापक डॉ. शरद मेश्राम, अजय राऊत, डॉ. डी. एल. चौधरी, जिल्हा परिषदेचे माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ अतुल गजभिये, तसेच छायाचित्रकार योगेश मेश्राम उपस्थित होते.
           ‘ओळख गोंदिया जिल्ह्याची’ या पुस्तिकेत जिल्ह्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, ‘एक जिल्हा-एक उत्पादन’ उपक्रम, जिल्ह्याची वैशिष्ट्ये, जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या, जलसमृद्धी व सिंचन प्रकल्प, वनक्षेत्र, वन्यजीव व अभयारण्ये, महाराष्ट्रातील एकमेव तिबेटीयन कॅम्प, सारस पक्षी संवर्धन, कृषी क्षेत्र आणि औद्योगिक विकास यांसारख्या विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
           याशिवाय जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे, देवरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांचे योगदान, जिल्ह्याची लोकसंख्या, दरडोई उत्पन्न, मानव विकास निर्देशांक, साक्षरतेचे प्रमाण, महसूल उपविभाग, नगरपरिषदा, नगरपंचायती, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांचीही माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्याची खाद्यसंस्कृती, रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून आरोग्य, परंपरा व ग्रामीण अर्थकारणाला मिळणारी दिशा तसेच झाडीपट्टीतील नाटके व लोकनाट्ये अशा सांस्कृतिक वैशिष्ट्यांनाही पुस्तिकेत स्थान देण्यात आले आहे.
           जिल्ह्याच्या विविधांगी वैशिष्ट्यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, या दृष्टीने पुस्तिकेची विषयानुरूप मांडणी करण्यात आली आहे. आकर्षक बांधणी, दर्जेदार छायाचित्रे आणि विविध विषयांवरील माहितीपूर्ण लेख यांमुळे पुस्तिकेला विशेष वेगळेपण प्राप्त झाले आहे.
           विशेषतः विद्यार्थ्यांना जिल्ह्याची भौगोलिक, प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक माहिती एकत्रितपणे उपलब्ध होणार असल्याने या पुस्तिकेचा अभ्यासासाठी निश्चितच लाभ होईल. जिल्ह्याची ओळख, वैशिष्ट्ये आणि समृद्ध वारसा अधोरेखित करणारा हा माहितीपर उपक्रम जिल्ह्याच्या सर्वांगीण परिचयाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
           कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंपादक कैलाश गजभिये यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी धम्मदिप बोरकर, तुषार उरकांदे, अतिक अंसारी व संतोष राऊत यांनी सहकार्य केले.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!