डवकी टोला येथील मन हेलावून टाकणारी घटना; मंजूर उड्डाणपुलाचे काम रखडल्याने नागरिकांमधून तीव्र संताप
“आणखी किती बळी घेतल्यावर प्रशासनाला जाग येणार?” — ग्रामस्थांचा संतप्त सवाल
देवरी : सणासुदीचा आनंद आणि उत्साहाचे वातावरण असतानाच गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी दुर्घटना समोर आली आहे. भाऊबिजेच्या पवित्र सणाच्या दिवशीच राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात डवकी टोला येथील एक तरुण ट्रकखाली चिरडला जाऊन जागीच ठार झाला। या दुर्दैवी घटनेमुळे डवकी टोलासह संपूर्ण देवरी परिसरात शोककळा पसरली असून, रखडलेल्या उड्डाणपुलाच्या मुद्द्यावरून नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काय आहे नेमकी घटना?
प्राप्त माहितीनुसार, भाऊबिजेच्या दिवशी सणाचा आनंद सुरू असताना डवकी टोला येथील एक युवक आपल्या दुचाकीने राष्ट्रीय महामार्गावरून आमगाव मार्गे जात होता. यादरम्यान, देवरी परिसतातून जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार युवकाचा मृतदेह छिन्नविछिन्न होऊन त्याचा जागीच प्राण गेला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सणाच्या दिवशीच घरातील कर्ता माणूस गेल्याने पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, बहिणीचा ओवाळणीचा सण रडारडित बदलला.
उड्डाणपुलाची मागणी कागदावरच, रखडलेले काम ठरतेय जिवावर
देवरी शहराच्या मधोमध गेलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे अपघातांची मालिका नवीन राहिलेली नाही. या महामार्गावर यापूर्वीही अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावा लागले आहेत. वारंवार होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत येथे उड्डाणपूल (Overbridge) मंजूर करण्यात आला होता.
मात्र, प्रशासकीय लालफितीचा कारभार, स्थानिकांचे राजकारण आणि काही कारणांमुळे मंजूर उड्डाणपुलाचे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही व ते रखडले. जर हा उड्डाणपूल वेळीच पूर्ण झाला असता, तर आज डवकी टोला येथील युवकाचा जीव वाचला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
दोषी कोण? प्रशासनावर कारवाईची मागणी
या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी यंत्रणेसमोर काही जळजळीत प्रश्न उपस्थित केले आहेत:
- भरधाव व बेदरकार पळवणारे ट्रक चालक?
- की मंजूर उड्डाणपुलाचे काम रोखून धरत जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या शक्ती?
- की या प्रकाराकडे डोळेझाक करणारे प्रशासन?
महामार्गावर आणखी किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार? असा संतप्त सवाल केला जात असून, मंजूर उड्डाणपुलाचे काम तात्काळ सुरू न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.








