ऑर्थोपेडिक वॉर्ड सुरू करण्याचे निर्देश; देवरी विधानसभा क्षेत्रासाठी तीन नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार
गोंदिया : ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी ग्रामीण रुग्णालय, देवरी येथील ट्रॉमा केअर युनिटची पाहणी केली. यावेळी ट्रॉमा केअर युनिट पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय सुविधांचा आढावा घेऊन ऑर्थोपेडिक वॉर्ड सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ट्रॉमा केअर सेंटरसाठी अस्थिरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ व इतर तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून द्यावी. तसेच आयपीएचएस अंतर्गत वाढविण्यात आलेल्या डॉक्टरांच्या मानधनाचा उपयोग करून तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवाही ग्रामीण रुग्णालयाला उपलब्ध करून घेण्याबाबत त्यांनी निर्देशित केले. रुग्णालयाच्या इमारतीची प्रलंबित कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करून ट्रॉमा केअर युनिटचे उद्घाटन करण्याची सूचनाही त्यांनी केली. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी रुग्णांशी संवाद साधून उपचार व आरोग्य सुविधांची माहिती घेतली. देवरी विधानसभा क्षेत्रातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आमदार संजय पुराम यांनी तीन नवीन १०८ रुग्णवाहिकांची मागणी केली. त्यावर पुढील महिन्यात एक आणि त्यानंतर उर्वरित दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले. यावेळी आमदार संजय पुराम, माजी आमदार सहषराम कोरोटे व मनोहर चंद्रिकापुरे, विशेष कार्यकारी अधिकारी अजितराव जंगम, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.








