गोंदिया : राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय न राहता, उत्पादीत होणाऱ्या शेतीमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतीशी निगडीत घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या गरजेनुरुप योग्यवेळी पोहचविणे आणि त्यासाठी आवश्यक सहाय्य व सोयीसुविधा पुरविणे गरजेचे आहे. त्यानुसार सन 2026-27 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत युरोप व चीन देशाची निवड करण्यात आली आहे.
शेतकरी निवडीचे निकष : अभ्यास दौऱ्याकरिता जाणारा लाभार्थी हा स्वत: शेतकरी असावा. स्वतःच्या नावे चालु कालावधीचा 7/12 व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे उत्पनाचे मुख्य साधन शेती असावे व तसे त्याने स्वयंघोषणापत्रात नमूद करावे (प्रपत्र-2). शेतकऱ्यांचे अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्याने स्वखर्चाने जरी इतर कुटुंब सदस्यास सोबत घ्यावयाचे असेल तरी सहल व्यवस्थापनास येणाऱ्या संभाव्य अडचणीमुळे त्यास परवानगी दिली जाणार नाही. सोबत शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत जोडावी (कुटुंब या व्याख्येमध्ये पती, पत्नी व 18 वर्षाखालील मुले/मुली). शेतकऱ्यानं त्यांच्या आधार प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी 25 वर्ष पूर्ण असावे. कमाल वयाची अट नाही परंतु, शेतकरी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे बंधनकारक आहे. यासाठी सदर योजनेत सहभागी होण्यास अर्ज सादर करताना शारीरिकदृष्टया तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र (किमान एम.बी.बी.एस. डॉक्टरचे सादर करावे). शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा. पुराव्यासाठी पारपत्राची मुदत/वैधता दर्शविणाऱ्या पानाची झेरॉक्स प्रत जोडावी. अर्ज सादर करतेवेळी पारपत्राची वैध मुदत किमान एक वर्ष असावी.
शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीस नसावा तसेच वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सी.ए. (चारटर्ड अकांऊट), अभियंता, कंत्राटदार इत्यादी नसावा, तसे त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद करावे (प्रपत्र-2). शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय (केंद्र/राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत कृषि विद्यापीठामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत) अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा, तसे त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद कारावे (प्रपत्र-२).
शेतकऱ्याची अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याचे पत्र कृषि विभागाकडून मिळाल्यानंतर शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारिरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र (किमान एम.बी.बी.एस. डॉक्टरचे) सादर करावे. कोरोनाविषयक तपासणी करून तसा अहवाल कृषि आयुक्तालयास सादर करणे बंधनकारक आहे. या अहवालानुसार शेतकऱ्यास कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसल्याचे तसेच सलग 7 ते 10 दिवस कालावधीचा परदेश दौरा करण्यास शेतकरी शारीरीकदृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे.
शासनाकडून अभ्यास दौऱ्याकरिता सर्व घटकातील (संवर्गातील) शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 50% रक्कम किंवा जास्तीत जास्त रुपये 2.00 लाख यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय आहे. सदर दौऱ्याकरिता जिल्हयाला 5 शेतक-यांचे लक्षांक असून यामध्ये जिल्हयात 1 महिला शेतकरी व 1 केंद्र/राज्य स्तरावरील विविध कृषी पुरस्कार प्राप्त/ पीक स्पर्धा विजेते शेतकरी व इतर 3 शेतकरी लक्षांक आहे. लक्षांक मर्यादेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरावर सोडत काढून ज्येष्ठता क्रमवारीनुसार शेतकऱ्यांची निवड केली जाईल.
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे : चालु सहा महिन्यांचा 7/12 उतारा, आधार कार्डची प्रत, रेशन कार्डची प्रत, डॉक्टरांकडून मिळालेले तंदुरुस्ती प्रमाणपत्र, वैध पासपोर्टची प्रत.
शेतकरी अभ्यास दौऱ्याकरिता शेतकऱ्यांनी दि.17 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथे अर्ज सादर करावा, प्राप्त अर्जातून जिल्हास्तरीय समितीसमोर सोडत काढण्यात येणार आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे यांनी कळविले आहे.








