गोंदिया ( देवरी ) : भारतीय जनता पक्षाच्या गोंदिया येथील अग्रसेन भवनात आयोजित विशेष बैठकीत पक्षाच्या युवा मोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला. यामध्ये देवरी येथील पक्षाचे सक्रिय व अभ्यासू कार्यकर्ते दिशांत सुरेश चन्ने यांची भाजप युवा मोर्चाच्या गोंदिया जिल्हा उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षा सीता रहांगडाले यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
दिशांत चन्ने यांनी आजवर सामाजिक व राजकीय क्षेत्रात बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका आणि पक्षाच्या संघटन वाढीसाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न लक्षात घेऊन वरिष्ठांनी त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या या निवडीमुळे देवरी तालुका व परिसरातील तरुण कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून, युवा नेतृत्वाला योग्य न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
आपल्या या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना दिशांत चन्ने म्हणाले, “वरिष्ठांनी माझ्या कार्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत, युवकांचे प्रश्न सोडवणे आणि पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”
त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय भाजप जिल्हाध्यक्षा सीता रहांगडाले, भंडारा-गोंदिया संघटक समन्वयक वीरेंद्र अंजनकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित अग्रवाल, उपाध्यक्ष राजू शाहू, महामंत्री इंदरजीतसिंग भाटिया यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते व कार्यकर्त्यांना दिले आहे. चन्ने यांच्या या नियुक्तीबद्दल जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.









