मृद व जलसंधारणासाठी ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ स्पर्धा; युवक-युवतींना संधी, विजेत्यांना 25 हजारांपर्यंत बक्षीस

१५ ते २१ ऑगस्ट जलसंधारण सप्ताहात राज्यभर आयोजन; १५ ते ३० वयोगटातील युवक घेऊ शकणार सहभाग

महाराष्ट्र : माती वाचवा, पाणी वाचवा, भविष्य सुरक्षित करा… हा संदेश राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने एक अनोखी शक्कल लढवली आहे. सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणाऱ्या युवकांच्या कल्पकतेचा वापर करून विभागाने ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ ही राज्यव्यापी रील्स स्पर्धा जाहीर केली आहे. १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताहात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.

माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ साजरा होतो. त्यानिमित्त ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ सह विविध उपक्रम होत असून त्याचाच एक भाग म्हणून ही रील्स स्पर्धा घेतली जात आहे.

कोण घेऊ शकतो भाग?

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील १५ ते ३० वयोगटातील कोणताही युवक-युवती भाग घेऊ शकतो. ही स्पर्धा पूर्णपणे जिल्हास्तरावर होणार आहे.

अटी आणि नियम –
प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करायची आहे.
रीलच्या सुरुवातीलाच रीलचा उद्देश, स्वतःचे पूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव सांगणे बंधनकारक आहे.
Reel स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी लागेल.
मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करणे बंधनकारक राहील.
सोबत अधिकृत हॅशटॅग #SaveSoilSaveWater वापरणे अनिवार्य आहे.

रील्स कशावर बनवायची? विषय कोणते?

आयोजकांनी रील्ससाठी भरपूर विषय दिले आहेत – माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारणाची कामे, पारंपरिक पद्धती, माती-पाणी वाचवण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि ‘आजचे संवर्धन उद्याचे सुरक्षित भविष्य’.

गुण कसे मिळणार? फक्त लाईक्सवर नाही!

केवळ लाईक्स किंवा फॉलोअर्सवर विजेता ठरणार नाही. यासाठी गुणांकन पद्धत ठेवली आहे.
विषय व संदेश – ३० गुण, कल्पकता – २५ गुण, प्रभावी सामाजिक संदेश – २० गुण, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता – १५ गुण, Instagram Engagement – १० गुण असे एकूण १०० गुण असतील. तज्ज्ञांचे परीक्षण आणि सोशल मीडिया एंगेजमेंट याचा समतोल साधून विजेते निवडले जातील.

बक्षीस काय?

राज्यासाठी एकच अधिकृत हॅशटॅग #SaveSoilSaveWater असणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० रील्स आणि राज्यभरातून १० हजार रील्सचे उद्दिष्ट ठेवले आहे.

जिल्हास्तरावर – प्रथम पुरस्कार २५ हजार रुपये व गौरवचिन्ह, द्वितीय पुरस्कार १५ हजार व गौरवचिन्ह, तृतीय पुरस्कार १० हजार व गौरवचिन्ह.
सर्व पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र मिळणार असून विजेत्यांना “युवा मृद-जलदूत” म्हणून विशेष गौरविले जाणार आहे.

“एक Reel… मातीसाठी !, एक Reel… पाण्यासाठी !, एक Reel… सुरक्षित भविष्यासाठी !” हा या स्पर्धेचा मुख्य संदेश असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!