गोंदिया ( देवरी ) : ग्रामपंचायत गोटाबोडी येथे दिनांक २१ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा अपूर्ण राहिल्याने, ती पुढे चालू ठेवून उर्वरित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आवश्यक निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी पंचायत समिती देवरीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे (BDO) निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, २१/०८/२०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता गोटाबोडी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी मागील सभेचे इतिवृत्त, मनरेगा, तंटामुक्त समिती, वनहक्क, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि विविध शासकीय योजनांतील लाभार्थी निवड यासारखे महत्त्वाचे विषय अजेंड्यावर होते.
परंतु, प्रत्यक्ष ग्रामसभेत जाहीर सूचनेतील सर्व विषयांवर चर्चा झाली नाही. गावकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना समाधानकारक व स्पष्ट उत्तरे देण्यात आली नाहीत. तसेच ग्रामपंचायत अधिकारी सभेत अनुपस्थित असल्याने ग्रामस्थांना योग्य माहिती मिळू शकली नाही. ग्रामस्थांनी प्रश्न विचारले असता, प्रशासकांनी सभा अर्धवट सोडून सभा संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे ग्रामसभेचे कामकाज अपूर्णच राहिले.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:
• २१/०८/२०२६ रोजी अर्धवट राहिलेली ग्रामसभा पुढे घेण्याबाबत ग्रामपंचायत गोटाबोडीला तात्काळ निर्देश देण्यात यावेत.
• जाहीर सूचनेतील सर्व उर्वरित विषय आणि गावकऱ्यांचे प्रश्न पुढील ग्रामसभेत घेऊन त्यावर सविस्तर चर्चा करण्यात यावी.
याबाबत पंचायत समिती स्तरावरून योग्य ती दखल घेऊन ग्रामपंचायतीस त्वरित आदेश जारी करावेत, अशी आग्रही मागणी गोटाबोडीतील ग्रामस्थांनी केली आहे.








