हाजरा फॉलवर पर्यटकांची लूट ; चारचाकीला ५० तर व्यक्तीमागे २० रुपयांची बेकायदा वसुली…

गोंदिया ( सालेकसा ) हाजरा फॉल :- निसर्गरम्य आणि जिल्ह्यातील एकमेव आकर्षण असलेल्या सालेकसा तालुक्यातील प्रसिद्ध हाजरा फॉल येथे पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेत पार्किंग आणि प्रवेश शुल्काच्या नावावर पर्यटकांची खुलेआम लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

प्रत्यक्षदर्शी पर्यटकांनी दिलेल्या माहितीनुसार, धबधब्यावर येणाऱ्या प्रत्येक चारचाकी वाहनाकडून ३० ते ५० रुपये आणि प्रत्येक व्यक्तीमागे २० रुपये अशी जबरदस्तीने वसुली केली जात आहे. म्हणजेच ५ जणांचे कुटुंब गेल्यास १०० रुपये एंट्री फी + ५० रुपये पार्किंग असे १५० रुपयांचा भुर्दंड पडत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, ही वसुली करूनही पर्यटकांना कोणत्याही प्रकारची शासकीय पावती दिली जात नाही. ही रक्कम कोणाच्या खिशात जाते? ग्रामपंचायत, वनविभाग की खासगी व्यक्ती वसुली करते? याचा कोणताही हिशेब प्रशासनाकडे नाही. त्यामुळे ही वसुली अवैध आणि बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट होत आहे.

सुविधांच्या नावाने बोंबाबोंब, जीवाशी खेळ

एकीकडे पैसे घेतले जात असताना दुसरीकडे पर्यटकांसाठी कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत.

– महिलांसाठी योग्य शौचालय नाही, कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूम नाही.
– पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नाही, कचरा टाकण्यासाठी डस्टबिन नाहीत.
– धबधब्याच्या खोल डोहाजवळ कोणतेही संरक्षक कठडे नाहीत.
– सुरक्षेसाठी एकही लाईफ गार्ड, लाईफ जॅकेट किंवा पोलीस कर्मचारी तैनात नाही.

पैसे देऊनही सुविधा शून्य असल्याने पर्यटकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. येथे काही नागरीकांचे बुडून मृत्यू होऊनही प्रशासनाला जाग येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

हाजरा फॉल हा वनविभागाच्या अखत्यारीत येतो. पर्यटन विकासासाठी लाखो रुपयांच्या योजना कागदावर दाखवल्या जातात, मात्र प्रत्यक्षात जमिनीवर काहीच नाही. अवैध वसुलीवर तहसील प्रशासन, वनविभाग आणि सालेकसा पोलीस यांचे कोणतेही नियंत्रण नसल्याने मनमानी सुरू आहे.

पर्यटकांची लूट थांबवून शासकीय दराने पावतीसह पार्किंग सुरू करावे, मिळणारा निधी पर्यटन विकासासाठी वापरावा आणि तात्काळ सुरक्षा रक्षक व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी पर्यटकांकडून होत आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!