जंगलातील ‘अड्डा’ उद्ध्वस्त: चारचाकी, १४ मोबाईल अन् रोख रक्कम जप्त; गोंदिया एलसीबीची मध्यरात्री मोठी कारवाई

गोंदिया ( ग्रामीण ) : गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा इर्री येथील झुडपी जंगलात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने २५ ऑगस्टच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या १२ जणांना रंगेहात पकडले असून, रोख रक्कमेसह वाहने व मोबाईल असा एकूण १२ लाख ४ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जुगार खेळणाऱ्या आणि चालवणाऱ्या एकूण १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी झाली कारवाई:
पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार व एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक गस्त घालत असताना, इर्री जंगलात ५२ ताशपत्यांवर पैशांची बाजी लावून जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी २५ ऑगस्टच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास अचानक धाड टाकली.
जप्त केलेला मुद्देमाल:
नगदी रक्कम: ६८,३०० रुपये
वाहने: १ चारचाकी (किंमत ८ लाख रु.) आणि १ मोटरसायकल (किंमत ७०,००० रु.)
मोबाईल: १४ अँड्रॉइड मोबाईल (किंमत २,६१,००० रु.)
इतर: जुगाराचे साहित्य
(एकूण मुद्देमाल: रु. १२,०४,५५०/-)
ताब्यात घेतलेले व पसार आरोपी:
कारवाईदरम्यान मोहित साखरे (२८), नितेश बागडे (२७), दिनेश ऊर्फ राहुल चतुर्वेदी (१९), डोहेल बारे (२१), शिवकुमार लिल्हारे (४२), मुकेश भोंडेकर (४२), विलास मानकर (२४), प्रलय मेश्राम (३५), आकाश भिमटे (३२), विक्की मस्करे (२७), आशिष उके (२९, सर्व रा. गोंदिया) आणि मधुकर गोंडाणे (५१, रा. ठाणा, आमगाव) हे १२ जण जुगार खेळताना रंगेहात सापडले.
तसेच कारवाईदरम्यान निलेश उके (कुडवा), विवेक रहीले (इर्री) आणि अभय बारई (गोंदिया) हे तिघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
अड्डा चालवणाऱ्यांवरही कारवाई:
पकडलेल्या आरोपींची विचारपूस केली असता, सदर जुगार अड्डा किसन दमाहे (इर्री), मुकेश ऊर्फ बल्ला बिरीया (मुरपार, रावणवाडी), सतीश मेन्ढे (सुपलीपार) आणि जितु पारासर (संजयनगर, गोंदिया) हे चार जण मिळून चालवत असल्याचे उघडकीस आले.
गुन्हा दाखल:
पोलीस हवालदार संजय चव्हाण यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात १९ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, सपोनि अभिषेक जंगमवार, सपोनि अमरदिप खाडे तसेच एलसीबी पथकातील अंमलदारांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास गोंदिया ग्रामीण पोलीस करीत आहेत.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!