भागी शिवारात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून भीषण अपघात ; एका मजुराचा मृत्यू, ३ गंभीर जखमी

SDO चे बांधकाम थांबविण्याचे आदेश असतानाही काम सुरूच, ग्रामसेवक-तलाठी यांचे दुर्लक्ष

कोर्टात प्रकरण प्रलंबित असतानाही बांधकाम ; इमारत पंचायत समिती सभापतीच्या मालकीची असल्याची चर्चा

गोंदिया ( देवरी, भागी ) : आमगाव राज्य महामार्गालगत असलेल्या ग्राम भागी शिवारात आज सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून एका मजुराचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला, तर तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भागी शिवारात एका नव्या इमारतीचे बांधकाम वेगात सुरू होते. काम सुरू असतानाच स्लॅबचा मोठा भाग अचानक कोसळला. त्याखाली काम करणारे चार मजूर थेट गाडले गेले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत ढिगाऱ्याखालून मजुरांना बाहेर काढले.

या घटनेत दिनेश मदन नाईक (वय ३८, रा. मुल्ला) हे गंभीर जखमी झाले. त्यांना १०८ रुग्णवाहिकेने देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर रूपेंद्र राऊत (३५, रा. कटंगी), भूमेंद्र घासले (३०, रा. मुल्ला) आणि हितेंद्र खोब्रागडे (रा. भडंगा) हे तिघे गंभीर जखमी झाले असून, प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथे हलविण्यात आले आहे.

प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली

या जागेबाबत उपविभागीय अधिकारी यांनी यापूर्वीच बांधकाम थांबविण्याचे आदेश दिले होते, असे सांगितले जात आहे. तसेच ग्रामसेवक व तलाठी यांनाही याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आदेशानंतरही संबंधितांनी दुर्लक्ष करून बांधकाम सुरूच ठेवल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.

कोर्टात केस सुरू असतानाही बांधकाम सुरूच

धक्कादायक बाब म्हणजे, सदर जागेचा वाद न्यायप्रविष्ट असून कोर्टात केस सुरू असतानाही तेथे बांधकाम सुरू होते, असा दावा स्थानिकांनी केला आहे.

जबाबदार कोण?

या दुर्घटनेमुळे बांधकामाच्या दर्जावर आणि कामगार सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर इमारत देवरी पंचायत समितीच्या सभापतीच्या मालकीची असल्याची चर्चा परिसरात असून, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून निष्काळजीपणा करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

या घटनेला आता जबाबदार कोण? कारवाई कोणावर होणार? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!