कत्तलीसाठी जाणाऱ्या ४२ गोवंशियांची सुटका; गोंदिया एलसीबीची धडाकेबाज कारवाई, ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया ( सालेकसा ) : दि. 29/8/26 स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) गोंदियाच्या पथकाने सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दलदलकुही परिसरात मोठी कारवाई करत गोवंशाची अवैध आणि निर्दयतेने वाहतूक करणारे दोन कंटेनर ट्रक जप्त केले आहेत. या कारवाईत ४२ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून, २ कंटेनर व मोबाईलसह ५१ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एकूण १३ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशाप्रमाणे एलसीबी पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक हद्दीत गस्त घालत असताना, सालेकसा हद्दीतील दलदलकुही येथून दोन कंटेनरमधून गोवंश कत्तलीसाठी नेले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे दलदलकुही ते धनेगाव मार्गावर नाकाबंदी करण्यात आली.
वाहनांमध्ये केले होते विशेष बदल
नाकाबंदीदरम्यान संशयित दोन कंटेनर ट्रक थांबवून तपासणी केली असता, एका ट्रक चालकाचे नाव इद्रिश कलुवा कुरैशी (वय ५०, रा. नागपूर/आग्रा) तर दुसऱ्या ट्रक चालकाचे नाव अन्वर शब्बीर अली (वय ४६, रा. कामठी, नागपूर) असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही वाहनांची पाहणी केली असता एका कंटेनरमध्ये २५ आणि दुसऱ्यात १७ असे एकूण ४२ गोवंश अत्यंत दाटीवाटीने व क्रूरतेने बांधून ठेवल्याचे आढळून आले. जनावरांना कोंबण्यासाठी ट्रक मालक जावेद अहमद व हरीलाल ब्रिजभानसिंग यांनी वाहनांमध्ये लोखंडी पाटी, कॅबिनमधून आत जाण्याचा मार्ग व खिडक्या असे विशेष बेकायदेशीर बदल केले होते.
जप्त मुद्देमालाचा तपशील
• गोवंश जनावरे: ४२ नग (किंमत ₹६,३०,० ००/-)
• वाहने: २ कंटेनर ट्रक (किंमत ₹४५,००,०००/-)
• मोबाईल: ४ अँड्रॉइड हँडसेट (किंमत ₹५७,०००/-)
• एकूण किंमत: ₹५१,८७,०००/-
१३ जणांवर गुन्हा दाखल
तपासात सदर गोवंश सैफुर भाई याने खरेदी करून नागपूर येथील मुंजबिल कुरैशी आणि फैजुल हसन यांच्याकडे कत्तलीसाठी पाठवले असल्याचे समोर आले. या प्रकरणी चालक, लेबर, वाहन मालक व खरेदीदार अशा १३ आरोपींविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा १९६० आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदर कामगिरी सपोनि अभिषेक जंगमवार, पोलीस अंमलदार तुलसीदास लुटे, राजकुमार खोटेले, दुर्गेश तिवारी, प्रकाश गायधने, सुनील डहाके, हंसराज भांडारकर, निलेश ठाकरे व राम खंदारे यांनी बजावली.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

error: Copy Is Not Allowed !!