गोंदिया ( आमगाव ) : शसनाकडून पाच एकर शेती मिळण्यासाठी आवश्यक NOC (ना हरकत प्रमाणपत्र) आणि ग्रामपंचायतीचा ठराव तयार करून देण्याच्या मोबदल्यात तब्बल १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना मानेगावच्या ग्रामसेविका आणि तिच्या पतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), गोंदियाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. ही धडक कारवाई मंगळवारी (दि. १३) गोंदिया शहरातील त्यांच्या राहत्या घरी करण्यात आली.
श्रीमती उषा जयकृष्ण पाटील (वय ४२, पद – ग्रामसेवक, ग्रामपंचायत मानेगाव, ता. आमगाव) आणि रमाकांत ग्यानीराम मोटघरे (वय ५४, पद – विषय साधन व्यक्ती, पंचायत समिती सालेकसा, दोघे रा. राधाकृष्ण कॉलनी, छोटा गोंदिया) असे जाळ्यात अडकलेल्या आरोपी पती-पत्नीचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
तक्रारदार हे सेवानिवृत्त सैनिक असून त्यांना शासनाकडून पाच एकर शेती मिळण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करावयाचा होता. या प्रस्तावाशी संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन एनओसीचे कागदपत्र तयार करून देण्यासाठी आरोपींनी सरपंच व सदस्यांच्या नावावर ५,५०,००० रुपयांची लाच मागितली. तसेच काम सुरू करण्यासाठी स्वतःकरिता वेगळी १,००,००० रुपयांची लाचेची मागणी केली होती.
याबाबत त्रस्त सेवानिवृत्त सैनिकाने ९ ऑक्टोबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार दिली होती. एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता, आरोपींनी १ लाख रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम १२ किंवा १३ ऑक्टोबर २०२६ रोजी गोंदिया येथील राहत्या घरी आणून देण्यास सांगितले होते.
अशी झाली सापळा कारवाई
ठरल्याप्रमाणे आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने तक्रारदाराला पंचासह लाचेची रक्कम घेऊन आरोपींच्या घरी पाठवले. पडताळणी दरम्यान ठरल्याप्रमाणे ग्रामसेविका उषा पाटील हिने इशारा केल्यानंतर तिचा पती रमाकांत मोटघरे याने तक्रारदाराकडून १,००,०००/- रुपये लाच रक्कम स्वीकारली. पंचांसमक्ष दोन्ही आरोपींना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे दोन्ही आरोपी लोकसेवकांविरुद्ध गुन्हा क्रमांक ८४४/२०२६, कलम ७, १२ भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एसीबीचे आवाहन
सदरची यशस्वी कारवाई पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, पोलीस निरीक्षक उमाकांत उगले आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदियाच्या पथकाने केली आहे.
भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया (दूरध्वनी: ०७१८२-२५१२०३, मोबाईल: ९२०९०४१०६४) किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीतर्फे करण्यात आले आहे.








