गोंदिया : राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत गोंदिया जिल्ह्यातील उर्वरित सात तालुक्यांचाही ‘ट्रिगर-२’ अंतर्गत दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी तिरोडा तालुक्याचा समावेश ट्रिगर-१ अंतर्गत करण्यात आला होता. आता जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ अधिकृतपणे जाहीर झाल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्त्वाची घोषणा केली असून, दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीला गती देण्यात येत आहे.
कर्जवसुलीला स्थगिती व वीजपुरवठ्याबाबत सक्त सूचना
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी कोणत्याही सहकारी सोसायट्या, जिल्हा बँका, राष्ट्रीयीकृत बँका किंवा मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लाऊ नये, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना त्रास होईल अशी कोणतीही कृती खपवून घेतली जाणार नाही. तसेच शेतीसाठी साडेसात अश्वशक्तीपर्यंतचा वीजपुरवठा मोफत असून, वीजबिलाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांवर अनुचित दबाव आणल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
अवैध पाणी उपशावर कठोर कारवाई
पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, पाण्याचा अवैध उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार, पाण्याचा गैरवापर थांबवण्यासाठी राज्यभरात तब्बल १६ हजार वीजजोडण्या तोडण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
दुष्काळी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि पालकांवरील आर्थिक ताण कमी व्हावा, यासाठी दुष्काळी तालुक्यांमधील सर्व विद्यार्थ्यांना कोणतेही निकष न लावता सरसकट परीक्षा शुल्क माफी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे.
जनावरांसाठी चारा आणि हमीभाव खरेदी
दुष्काळी भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नियोजन सुरू आहे. ज्या भागात पाण्याची उपलब्धता आहे, तेथे चारा पिकांची लागवड करण्यावर भर दिला जावा. तसेच आगामी रब्बी हंगामात ज्वारीसारखी चारा देणारी पिके घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या चाऱ्याची शासनाकडून हमीभावाने खरेदी केली जाईल, अशी घोषणाही करण्यात आली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्याने पिण्याचे पाणी, चारा उपलब्धता, कर्जमाफीचा दिलासा आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करणे यांसारख्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.









