गोंदिया ( देवरी ) : घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या एका कुटुंबाच्या घरी डल्ला मारणाऱ्या तीन सराईत घरफोड्यांना देवरी पोलिसांनी रात्री गस्तीदरम्यान सतर्कता दाखवत पाठलाग करून यशस्वीरीत्या जेरबंद केले. त्यांच्याकडून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
काय आहे नेमकी घटना?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार सौ. भारती नितीन शिरपुरकर (वय ४६, रा. त्रुमुर्तीनगर) या आपल्या परिवारसह घराला कुलूप लावून ०३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास बाहेरगावी एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. हीच संधी साधून आरोपी बंटी विनोद धुर्वे (वय १८), अनिकेत कैलास कासोदे (वय २७) आणि अंकुश रामसिंग कवडे (सर्व रा. वरुळ, ता. अमरावती, जि. अमरावती) यांनी तक्रारदाराच्या घराच्या दरवाजाची कुंडी तोडून आत प्रवेश केला. बेडरूममध्ये ठेवलेले ४५ हजार रुपये रोख तसेच सोन्या-चांदीचे दागिने चोरून ते पोबारा करण्याच्या तयारीत होते. तसेच त्याच परिसरातील एका दुसऱ्या इसमाच्या घरीही चोरी करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांची फिल्मी स्टाईल पाठलाग आणि कारवाई
दरम्यान, रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना आरोपींच्या हालचालींवर संशय आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आरोपींचा पाठलाग करून त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस स्टेशन देवरी येथे संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे
पोलीस कोठडीत वाढ
आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दिनांक ०६/११/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. गणेश कृष्णा बनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हविंद्र बडोले करीत आहेत.
पोलीस प्रशासनाचे यशस्वी मार्गदर्शन
सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे (गोंदिया), अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे (कॅम्प देवरी) व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. गणेश कृष्णा बनारे, श्रेणी पोउपनि निलकंठ बोधनकर, पो.हवा. दारासिंग पटेल, पो.ना. इंदवीर पंधरे, पो.शि. देवेंद्र नेताम, विशाल खांडेकर महेश धुर्वे, म.पोना लता राजाभोज व मपोशि निता कांबळे यांनी पार पाडली.








