ग्रामीण भागात हातभट्टी, देशी-विदेशी दारूची खुलेआम विक्री; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह
गोंदिया ( देवरी ) : आनंदाचा आणि दिव्यांचा सण असलेल्या दिवाळीच्या तोंडावर देवरी तालुक्यात अवैध दारूचा अक्षरशः महापूर आला आहे. सणासुदीच्या काळात ग्रामीण भागात हातभट्टी, देशी आणि विदेशी दारूची खुलेआम विक्री होत असून, राज्य उत्पादन शुल्क (Excise) विभागाच्या मेहरबानीमुळेच हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप संतप्त नागरिकांमधून होत आहे.
गावोगावी मोठा स्टॉक, संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर
दिवाळीत ग्रामीण भागात दारूची मागणी वाढते, याच संधीचा फायदा घेत तालुक्यातील अवैध विक्रेत्यांचे जाळे अधिक सक्रिय झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील अनेक गावांमध्ये किराणा दुकाने, पानठेले आणि काही घरांमध्ये दारूचा मोठा स्टॉक करून ठेवण्यात आला आहे.
सणासुदीला मिळणारा बोनस असो वा शेतमजुरीचे कष्टाचे पैसे, सर्व काही दारूच्या आहारी जात असल्याने अनेक हसती-खेळती कुटुंबे आणि तरुणाई उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या वाढत्या व्यसनाधीनतेमुळे ग्रामीण भागातील शांतता धोक्यात आली आहे.
उत्पादन शुल्क विभागाची कारवाई म्हणजे केवळ ‘कागदी फार्स’!
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महिन्यातून एखाद-दुसरी किरकोळ कारवाई करून १०-२० लिटर दारू जप्त केल्याचा देखावा केला जातो. दिवाळीसारख्या सणात विशेष मोहीम राबवणे अपेक्षित असताना, संबंधित विभाग मात्र गाढ झोपेत असल्याचे दिसून येत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कारवाईचा फार्स झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच ठिकाणी पुन्हा जोमाने दारूविक्री सुरू होते. यामुळे प्रशासनाच्या वरदहस्ताशिवाय हा अवैध बाजार सुरूच राहू शकत नाही, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
महिला वर्गाचा तीव्र संताप; कारवाईची मागणी
या प्रकारामुळे महिला वर्गामध्ये तीव्र संताप उसळला आहे. “दिवाळी हा आनंदाचा सण आहे, पण दारूमुळे आमच्या घरात रोज भांडणे आणि अशांतता पसरत आहे. प्रशासनाने येन दिवाळीत तरी हे अड्डे कायमचे बंद करावेत,” अशी आर्त हाक महिला बचत गटांच्या महिलांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची गरज
या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी गांभीर्याने दखल घ्यावी, तसेच तातडीने विशेष संयुक्त मोहीम राबवून तालुक्यातील अवैध दारूचे अड्डे उद्ध्वस्त करावेत, अशी मागणी आता जोर धरत आहे.








